श्रीरामपूर|प्रतिनिधी
रेल्वेचा रूळ ओलांडत असताना बेलापूरच्या 62 वर्षीय वृद्ध महिलेचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर येथील तहसीलच्या कामासाठी बेलापूर येथून चार महिला आल्या होत्या. तहसीलकडे जाण्यासाठी त्यांना रेल्वे स्टेशनचा रूळ ओलांडायचा होता.
चौघींपैकी तीन महिला रेल्वे स्टेशनवर असलेल्या ब्रिजवरून पलिकडे गेल्या. चौथी महिला जवळचा मार्ग म्हणून थेट रेल्वे रूळावर उतरली. रूळ ओलांडत असतानाच हुगळी-वाराणसी ही गाडी आली. रेल्वेचा आवाज येताच महिला घाबरली. घाबरल्यामुळे गोंधळून ती रेल्वे रूळाच्या पलीकडे जाण्याऐवजी सरळ रेल्वे रूळावरून पळू लागली आणि रेल्वेखाली सापडून ठार झाली, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
तिघी महिला ब्रिजवरून गेल्यामुळे त्या वाचल्या; जवळच्या मार्गाने जाण्याच्या प्रयत्नात महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचे बोलले जात आहे.