अहिल्यानगर | प्रतिनिधी
चितळे रोड गणेशोत्सव 2025. शहरातील चितळे रोडवरील नेता सुभाष मित्र मंडळ ट्रस्ट गणरायाच्या आरासला यंदा अभूतपूर्व गर्दी झाली आहे. पारंपरिक देखावा आणि आधुनिक सजावटीचा मिलाफ असलेल्या आरासाने गणेशभक्तांना आकर्षित केले असून, विसर्जनाच्या दिवसापर्यंत ही गर्दी कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चितळे रोड म्हटले की स्वर्गीय आमदार अनिलभैय्या राठोड यांची आठवण आल्या शिवाय राहत नाही. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या मंडळाने दरवर्षी नवनवीन आरास साकारत लोकप्रियता मिळवली. त्यांचा वारसा त्याचे पुत्र युवासेनेचे विक्रम राठोड यांनी पुढे नेला असून, मंडळाची परंपरा अधिक भव्य स्वरूपात चालू ठेवली आहे.

यंदाच्या उत्सवात भाजपचे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, खासदार निलेश लंके आदी मान्यवरांनी मंडळात उपस्थिती दर्शवली. याशिवाय शिवसेना आणि युवासेनेचे नेतेमंडळी सक्रियपणे मंडळात सहभागी होत असल्याचे चित्र दिसून आले.
दरम्यान, आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चितळे रोडवरील गणेशोत्सवात होणाऱ्या गर्दी मुळे ठाकरेंची सेना शक्तिप्रदर्शन करताना दिसते.कार्यकर्त्यांचा उत्साह स्पष्टपणे जाणवत आहे.
गणेशभक्तांची गर्दी, राजकीय नेत्यांची उपस्थिती आणि मंडळाची आकर्षक आरास या तिहेरी संगमामुळे चितळे रोडचा गणराय यंदाही शहराच्या गणेशोत्सवाचा प्रमुख आकर्षणबिंदू ठरला आहे.