वाशिम / प्रतिनिधी
कुस्तीच्या आखाड्यात घडलेले असंख्य पैलवान आपले नाव गाजवत असताना, बोल्हेगाव येथील पुष्कर यशवंत परदेशी याने वाशिम येथे झालेल्या शालेय कुस्ती स्पर्धेत 16 वर्षांखालील वयोगटात 80 किलो वजन श्रेणीत बाजी मारत विजेतेपद पटकावले. या घवघवीत यशामुळे बोल्हेगावच्या मातीचा लौकिक उंचावला आहे.
धानोरकर विद्यालय, जिल्हा वाशिमचा विद्यार्थी असलेला पुष्कर सध्या पुण्यातील अमोल बुचुडे रेस्लिंग अकॅडमीमध्ये कुस्तीचे कसून धडे घेत आहे. घरात पिढ्यान् पिढ्या कुस्तीचे वातावरण असल्यामुळे लहानपणापासूनच त्याला या खेळाची गोडी लागली. त्याच्या घराण्याचा गावासाठी असलेला ठेवा विशेष मानला जातो. बोल्हेगावचे संस्थापक पै. किसनसिंग गोविंदसिंग परदेशी यांचा तो पणतू असून, पै. यशवंत जयसिंग परदेशी यांचा सुपुत्र आहे.
परदेशी घराण्याने गावासाठी केलेले योगदान आजवर लक्षणीय राहिले आहे. गाव वसवण्यापासून तालीम उभारून तरुणांना पैलवान होण्यासाठी घडवण्यापर्यंत हे घराने कधीही मागे हटले नाही. आजच्या काळातही गावातील मुलांनी कुस्तीक्षेत्रात चमकावे, नाव मिळवावे यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. त्याचा परिणाम म्हणूनच पुष्कर सारखे तरुण खेळाडू आघाडीवर येताना दिसत आहेत.
या विजयानंतर पुष्कर चे नातेवाईक आणि गावात आनंदाचे वातावरण असून गावकऱ्यांच्या वतीने मा. नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन पुष्करचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोल्हेगाव स्पोर्ट्स क्लब चे अध्यक्ष भाऊ कापडे उपस्थित होते. वाकळे यांनी कौतुकाची थाप देत, “असेच गावाचे नाव अधिक उज्ज्वल कर,” अशा शब्दात शुभेच्छांचा वर्षाव केला.यावेळी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.
पुष्करच्या यशामुळे बोल्हेगावच्या कुस्ती परंपरेला नवी झळाळी मिळाली असून, पुढे तो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील गावचा झेंडा उंचावेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
अभिनंदन👍👌