अहिल्यानगर | प्रतिनिधी
नगर तालुक्यात स्वयंसहायता महिला गटांना ३.२९ कोटींचे खेळते भांडवल; २४ लाखांचे बँक कर्ज वाटप. तालुक्यात आतापर्यंत २८७१ स्वयंसहायता महिला गट स्थापन झाले असून या अभियानांतर्गत २६ हजार ९०३ कुटुंबांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत शासनाकडून गटांना खेळते भांडवल म्हणून प्रतिगट ३० हजार रुपये देण्यात येतात. त्यानुसार तालुक्यात आजअखेर २१९६ गटांना एकूण ३ कोटी २९ लाख रुपये वितरीत झाले आहेत.
चिचोंडी पाटील येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात पनन मंत्री जयकुमार रावत व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते नगर तालुक्यातील बचतगटांना २४ लाख १४ हजार रुपयांचे बँककर्ज वाटप करण्यात आले. यावेळी आमदार शिवाजी कर्डिले, भानुदास कोतकर, खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील, अक्षयदादा कर्डिले, दिलीप भालसिंग, बाजार समिती सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सुळ आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वयंसहायता गटातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रतिगट ६० हजार रुपयांचा समुदाय गुंतवणूक निधी (CIF) दिला जातो. तालुक्यातील २०८० गटांना आतापर्यंत १२ कोटी ४८ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले असून प्रातिनिधिक स्वरूपात दोन ग्रामसंघातील ४५ गटांना २७ लाखांचे धनादेश प्रदान करण्यात आले.
सन २०२५-२६ करिता तालुक्यास १५ कोटी रुपयांचे बँक पतपुरवठा उद्दिष्ट दिले असून आजअखेर ११.४७ कोटी रुपयांचे बँककर्ज वितरित करण्यात आले आहे. त्याचाच भाग म्हणून आज तीन बँकांच्या माध्यमातून चार गटांना २४ लाख १४ हजार रुपयांचे कर्ज देण्यात आले.
दरम्यान, प्रधानमंत्रींच्या महत्वाकांक्षी ‘लखपती दीदी’ प्रकल्पांतर्गत तालुक्यास ६६९८ उद्दिष्ट देण्यात आले असून ८२६७ महिलांची संभाव्य लखपती दीदी म्हणून निवड करण्यात आली आहे.