तिरुअनंतपुरम | प्रतिनिधी
ब्रेन-ईटिंग अमीबा’चा कहर, केरळ राज्यात आरोग्य यंत्रणेसमोर नवा मोठा धोका उभा ठाकला आहे. Naegleria fowleri या धोकादायक परजीवीमुळे पसरलेल्या संसर्गाने राज्यभरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आतापर्यंत 69 जणांना या अमीबाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं असून, तब्बल 19 जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत नोंद आहे.
हा जीवाणू साधारणपणे नाकावाटे शरीरात प्रवेश करतो आणि थेट मेंदूवर हल्ला करतो. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, हा आजार सुरुवातीला ताप, तीव्र डोकेदुखी, उलट्या, मान कडक होणे आणि भ्रम अशा गंभीर लक्षणांनी जाणवतो. संसर्ग झाल्यास रुग्णाची प्रकृती वेगाने ढासळते, त्यामुळे तात्काळ उपचार घेणं अत्यावश्यक आहे.
आरोग्य विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, स्वच्छ पाण्यात पोहताना काळजी घ्यावी, नाकात पाणी जाणार नाही याची दक्षता घ्यावी आणि तलाव-जलाशय वापरताना पूर्ण स्वच्छतेचे नियम पाळावेत. संसर्ग रोखण्यासाठी पाण्याचे स्त्रोत शुद्ध ठेवण्याचे आदेशही स्थानिक प्रशासनाने दिले आहेत.
राज्यातील रुग्णालयांमध्ये विशेष वैद्यकीय पथके सज्ज ठेवण्यात आली असून, परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य खात्याकडून सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचे निर्देश देण्यात आले
आहेत.