अहिल्यानगर|प्रतिनिधी
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. शहरातील ब्लॉक काँग्रेस शहराध्यक्ष, काँग्रेसच्या विविध आघाड्या, सेलचे अध्यक्ष, तसेच वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पदाचा राजीनामा देत शिवसेनेत (ठाकरे) प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
शुक्रवारी पाच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सामूहिकरीत्या आपला राजीनामा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सुपूर्द केला. या पदाधिकाऱ्यांमध्ये ब्लॉक काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष मनोज गुंदेचा, अल्पसंख्याक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडिवाला, महिला काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष उषा भगत महिला काँग्रेस शहर जिल्हा उपाध्यक्ष शैला लांडे, काँग्रेस ग्रंथालय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुनील लांडगे यांचा समावेश आहे.
या सर्वांचा भव्य प्रवेश सोहळा आज सायंकाळी मुंबईतील मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी शहरप्रमुख किरण काळे यांचे नेतृत्वात नव्याने प्रवेश घेणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात येईल.
काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमधून बाहेर पडत शिवसेनेत दाखल झालेले किरण काळे यांनी पक्षाला शहरात नवे बळ देण्याचे काम केले आहे. आता शहर काँग्रेसमधील महत्त्वाचे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने काँग्रेस संघटन अक्षरशः रिकामी झाली आहे.
या घडामोडींमुळे आगामी स्थानिक राजकारणात मोठा उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.