अहिल्यानगर | प्रतिनिधी
नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने निंबळक गावातील मानाच्या देवीची दिव्य ज्योत यंदा गुवहाटी (आसाम) येथील प्रसिद्ध कामाख्या देवीच्या मंदिरात प्रज्वलित करण्यात आली. महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या पत्नी सौ. सोनिया गोरे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून ही ज्योत प्रज्वलित झाली. आता ती तब्बल 2700 किलोमीटरचा प्रवास करत महाराष्ट्रात दाखल होणार आहे.
या सोहळ्यात उत्सवाचे आयोजक संतोष घोलप, निंबळकचे माजी उपसरपंच धनश्याम आबा म्हस्के, डॉ. मनिषा पाटील (पुणे), गंगापूरचे तहसिलदार उमेश पाटील, पिंपळगाव कौडाचे माजी सरपंच अरुण मुठे, शिवप्रहार संघटनेचे तालुका युवक अध्यक्ष गोऱख आढाव, आदर्श ग्रामपंचायत अधिकारी सुनील दुधाडे, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
आसाम–सिक्कीम–बिहार–उत्तर प्रदेश–मध्य प्रदेश अशी पाच राज्ये पार करून ही ज्योत अखेर महाराष्ट्रात येणार आहे. पावसाळी जंगलातील मार्ग आणि सततचा पाऊस यामुळे प्रवास कठीण असला, तरी ज्योत सुरक्षित ठेवण्यासाठी पर्यायी सुविधा तयार ठेवल्या आहेत, अशी माहिती आयोजक संतोष घोलप यांनी दिली. तर “कामाख्या देवीच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात सुख-शांती आणि समृद्धी नांदो,” अशी प्रार्थना सौ. सोनिया गोरे यांनी केली.
कामाख्या देवी हे 51 शक्तिपीठांपैकी एक बलशाली पीठ मानले जाते. त्यामुळे गुवहाटी येथील पुजारी आणि ट्रस्ट पदाधिकाऱ्यांनीही निंबळक ग्रामस्थांचा अभिमान व्यक्त केला. मागील वर्षी (2024) सप्तगंगेचे जल असणारा दिव्य कलश सौ. सोनिया गोरे यांना प्रदान करण्यात आला होता. यंदा हा मान कोणाला मिळणार, याबाबत अद्याप घोषणा झालेली नसल्याने भक्तांमध्ये उत्सुकता आहे.
गुवहाटीहून महाराष्ट्रात येणाऱ्या या दिव्य ज्योतीमुळे नवरात्र उत्सवाचे औचित्य अधिकच उजळून निघाले आहे.