अहिल्यानगर (प्रतिनिधी) –
एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थानात शारदीय नवरात्रोत्सवाची मंगल सुरुवात सोमवारी (दि. 22 सप्टेंबर) आमदार संग्राम जगताप व सौ. शितल जगताप यांच्या हस्ते विधीवत पूजा व घटस्थापनेने झाली. धार्मिक मंत्रोच्चार व घटस्थापना विधीने परिसर भक्तीमय झाला.
सकाळपासून भाविकांची गर्दी होत असताना संबल-डफच्या गजरात “रेणुका माता की जय” असा जयघोष घुमला. मुंजोबा युवक मंडळाने राशीन येथून आणलेली पवित्र ज्योत आ. जगताप यांच्या हस्ते मालदीप ज्योत म्हणून प्रज्वलित करण्यात आली. देवीच्या आरतीने वातावरण मंगलमय झाले.
या प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर भोर, उपाध्यक्ष साहेबराव भोर, सचिव दत्तात्रय विटेकर, खजिनदार एकनाथ वाघ यांच्यासह नगरसेवक, वकिल संघाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व मोठ्या संख्येने बोल्हेगाव, नागापूर परिसरातील भाविक उपस्थित होते.
आ. जगताप यांनी आपल्या भाषणात नारी शक्तीचे महत्व अधोरेखित करताना म्हटले की, “नवरात्रोत्सव हा स्त्रीशक्तीची पूजा करण्याचा पर्व आहे. नारी ही समाजाची उध्दारकर्ती असून, तिच्या विविध रूपांची उपासना केल्याने समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.”
दरम्यान, नुकतेच देवस्थानचे विश्वस्त गोरख कातोरे यांचे निधन झाल्याने यावर्षी सामाजिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांना फाटा देण्यात आला आहे. फक्त धार्मिक विधी, पूजा-अर्चा व घटस्थापना सोहळेच पार पाडले जाणार असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर भोर यांनी सांगितले.
देवस्थान परिसर विद्युत रोषणाई व फुलांच्या सजावटीने उजळून निघाला आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात दररोज होणाऱ्या आरत्या व धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.