अहिल्यानगर (प्रतिनिधी) –
फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी (२५ सप्टेंबर) उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यांनी थरारक वातावरण निर्माण केले. १४ व १६ वर्ष वयोगटातील सामन्यांमध्ये सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंट, प्रवरा पब्लिक स्कूल, तक्षिला स्कूल आणि आर्मी पब्लिक स्कूलच्या संघांनी विजयी कामगिरी करत उपांत्य फेरी गाठली.
सकाळच्या सत्रात १४ वर्ष वयोगटात अशोकभाऊ फिरोदिया स्कूलविरुद्धच्या सामन्यात सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंटने ४-१ गोलने विजय मिळवला. हर्षद सोनवणे याने हॅटट्रिक करत (२, २७ व ३१ मिनीटाला) चमक दाखवली, तर वेदांत देवकरने आणखी एक गोल जोडला. प्रतिस्पर्धी संघाकडून आयुष गाडळकरने एकमेव गोल केला.
१६ वर्ष वयोगटात ज्ञानसंपदा स्कूलविरुद्ध सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंटने ५-१ गोलने मात केली. जियान शेखने दोन गोल (२५ व ३९ मिनीटाला) केले, तर सोहम सोले, आयुष धापटकर व श्रीधर बीरदार यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला.
प्रवरा पब्लिक स्कूल आणि तक्षिला स्कूल यांच्यातील सामना शेवटपर्यंत गोलशून्य राहिला. पेनल्टी शूटआऊटमध्ये प्रवरा पब्लिक स्कूलने ४-२ असा विजय मिळवला. पवन वाणी, संजीत चंदन, मंगेश घरात आणि रुद्र पाटील यांनी संघाला विजय मिळवून दिला.
दुपारच्या सत्रात १४ वर्ष वयोगटात आर्मी पब्लिक स्कूलने द आयकॉन स्कूलवर २-० असा विजय मिळवला. सुरज येवलेने दोन्ही गोल करत संघाला उपांत्य फेरीत पोहोचवले.
१६ वर्ष वयोगटात आर्मी पब्लिक स्कूल आणि द आयकॉन स्कूल यांच्यातील सामना १-१ अशी बरोबरीत सुटला. आदर्श साबळे (आर्मी) व भार्गव पिंपळे (आयकॉन) यांनी प्रत्येकी एक गोल केला. पेनल्टीवर ५-४ असा विजय आर्मी पब्लिक स्कूलने मिळवला.
श्री साई स्कूलविरुद्ध १४ वर्ष वयोगटातील सामन्यात तक्षिला स्कूलने २-० असा विजय मिळवला. वेदांत इंगळे व साईराज कबाडी यांनी प्रत्येकी एक गोल करून तक्षिला स्कूलचा उपांत्य फेरीतील प्रवास निश्चित केला.