अहिल्यानगर (प्रतिनिधी) –
नगर तालुक्यातील निमगाव वाघा ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत, स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी गांधीजी, शास्त्रीजी व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस सरपंच उज्वलाताई कापसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी प्रविण पानसंबळ, संस्थेचे अध्यक्ष व सदस्य पै. नाना डोंगरे, माजी उपसरपंच प्रमोद जाधव, सोसायटीचे चेअरमन अतुल फलके, संदिप येणारे, सौरभ कापसे, सोमनाथ आतकर, युवा मंडळ अध्यक्ष संदिप डोंगरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरपंच उज्वला कापसे यांनी गांधीजींच्या सत्य-अहिंसा आणि स्वावलंबनाच्या मार्गाचे महत्त्व अधोरेखित करत ग्रामविकासासाठी प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडणे ही खरी राष्ट्रसेवा असल्याचे सांगितले. तसेच शास्त्रीजींचा “जय जवान, जय किसान” हा संदेश आजही तितकाच मार्गदर्शक असल्याचे नमूद केले.
पै. नाना डोंगरे यांनी महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचा गौरव करताना, “या महापुरुषांचे विचार आचरणात आणले तरच खरी समाजक्रांती घडेल,” असे प्रतिपादन केले. विचारांचा वारसा जपणे हीच खरी आदरांजली असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.