अहिल्यानगर (प्रतिनिधी) –
शहरासह जिल्ह्यात वाढत्या जातीय तणावाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने गुरुवारी (दि. २ ऑक्टोबर) पारनेर येथे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांची भेट घेतली. या वेळी शिष्टमंडळाने वारंवार घडणाऱ्या तणावजन्य घटनांकडे त्यांचे लक्ष वेधले.
यावर उपमुख्यमंत्री पवारांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना तातडीने बोलावून, जातीय तणाव निर्माण करणाऱ्यांवर त्यांचा पक्ष न पाहता कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच, प्रत्येक ठिकाणी मोहल्ला कमिटी तयार करून सामाजिक ऐक्य वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या.
शिष्टमंडळाने तक्रार मांडली की, कोठला येथे झालेल्या रास्ता रोको आंदोलनाच्या गुन्ह्यात निर्दोष व्यक्तींनाही अटक करण्यात आली असून त्यांची नावे वगळावीत. याशिवाय धार्मिक द्वेष पसरविणाऱ्या प्रक्षोभक भाषणांवर पोलिसांनी स्वतःहून (suo motu) कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
मुस्लिम समाजातील प्रतिनिधींनी सांगितले की, मागील दहा महिन्यांपासून काही लोकप्रतिनिधी व संघटना जाणूनबुजून तणाव निर्माण करणारी वक्तव्ये करत आहेत. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था बिघडत असून अल्पसंख्यांक समाजात भीतीचे वातावरण आहे. याचा थेट परिणाम व्यापार व स्थानिक बाजारपेठांवर होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘आय लव्ह मोहम्मद’ रांगोली विटंबना प्रकरणात आरोपी व त्याच्या कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासून त्याला हद्दपार करावे, तसेच या प्रकरणामागील मास्टर माइंडचा शोध घ्यावा, अशी मागणी देखील शिष्टमंडळाने केली.

या चर्चेत उबेद शेख, हाजी शौकत तांबोळी, माजी उपमहापौर हाजी नजीर शेख, शाकीर शेख, रफिक मुन्शी, सय्यद खलील, शफी जहागीरदार, अथर खान, इंजि. अख्तर, मतीन सय्यद, राजूशेठ सुपेवाले, ॲड. सय्यद अख्तर, मोबीन मुल्ला तांबटकर, फारुक बागवान, डॉ. रिजवान शेख, ॲड. हाफिज जहागीरदार, माजी पोलीस अधिकारी रऊफ रोख, ॲड. मोबीन, फैय्याज जहागीरदार, फैरोज सय्यद आदी उपस्थित होते.