अहिल्यानगर | प्रतिनिधी
कर्तव्यावर असताना मद्यपान केल्याच्या आरोपानंतर गुन्हा दाखल झाल्याने मानसिक तणावात आलेल्या एसटी चालकाने बसमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तारकपूर बस स्थानक परिसरात गुरुवारी (२ ऑक्टोबर) सकाळी घडली. या घटनेमुळे एसटी महामंडळात एकच खळबळ उडाली आहे.
सुरेश चंद्रभान धामोरे (वय ५४, रा. सारोळा कासार, ता. अहिल्यानगर) असे आत्महत्या केलेल्या चालकाचे नाव आहे. तारकपूर आगारातील एका एसटी बसमध्ये गळफास घेतलेल्या व्यक्तीबाबत माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. धामोरे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच एसटी कर्मचार्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, बुधवारी (१ ऑक्टोबर) तारकपूर आगाराचे वाहतूक नियंत्रक शिवाजी मारूती खजीनदार (वय ५६) यांनी धामोरे यांच्याविरुद्ध मद्यपान केल्याची तक्रार दाखल केली होती. वैद्यकीय तपासणीत मद्यसेवन सिद्ध झाल्याने त्यांच्यावर दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.
या कारवाईच्या धक्क्याने किंवा बदनामीच्या भीतीने धामोरे यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.
लय वाईट झाले