अहिल्यानगर | प्रतिनिधी
नगर तालुक्यातील नेप्ती महसूल मंडळातील नेप्ती, निमगाव वाघा, हिंगणगाव, जखणगाव, हिवरे बाजार, टाकळी खातगाव आणि इतर दहा गावांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिक मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पावसाने उघडीप दिल्यामुळे पंचनाम्यांना वेग आला असून अधिकारी चिखल तुडवीत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करत आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे.
या भागातील शेत पीक व फळबागांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले असून, शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत, अशी माहिती नेप्ती मंडळाचे अधिकारी प्रताप कळसे यांनी दिली.
सध्या पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अहिल्यानगर तहसीलदार यांच्या आदेशानुसार राबविले जात आहे. प्रत्येक गावात ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पर्यवेक्षण अधिकारी म्हणून नेप्ती मंडळाचे अधिकारी प्रताप कळसे यांची नेमणूक करण्यात आली आहे.
मंडळाने नेप्ती गावात पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांपैकी भानुदास विठोबा फुले यांच्या कांदा पिकाचे पंचनामे केले. यावेळी मंडळ अधिकारी, कृषी अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी तसेच माजी सरपंच, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सध्या मंडळातील सुमारे 3 हजार शेतकऱ्यांपैकी 2319 शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाले असून, सुमारे 1714 हेक्टर क्षेत्र बाधित असल्याचे नोंदवले गेले आहे. याशिवाय 4 घरांची आणि 4 विहिरींची पडझड झाली असून त्यांचे पंचनामेही पूर्ण झाले आहेत. नेप्ती महसूल मंडळातील 681 शेतकऱ्यांच्या सुमारे 501 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे अजून बाकी असून, पुढील दोन दिवसांत ते पूर्ण होणार आहेत.
पंचनामे तातडीने सुरू करून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केल्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.