अहिल्यानगर (प्रतिनिधी):
अहिल्यानगर शहरातील सावेडी परिसरातील प्रोफेसर कॉलनी चौकाजवळ असलेला कचरा डेपो नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका ठरत असून, असह्य दुर्गंधीमुळे स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन देत हा डेपो तातडीने अन्यत्र हलविण्याची मागणी केली आहे.
निवेदन देताना नागरिक प्रतिनिधी प्रणव भिंगारदिवे यांनी सांगितले की, “या डेपोमुळे परिसरात असह्य दुर्गंधी पसरली आहे. माशा, डास आणि कीटकांचा त्रास वाढला असून, लहान मुलांमध्ये आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.”
नागरिकांनी नमूद केले आहे की, या डेपोमुळे परिसरात दूषित वायू व अस्वच्छतेचा फैलाव झाला असून, पर्यावरण आणि आरोग्य दोन्ही धोक्यात आले आहे. प्रोफेसर कॉलनी हा वर्दळीचा व निवासी भाग असल्याने तातडीने कारवाई करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे मत आहे.

या प्रसंगी प्रणव भिंगारदिवे, शोभा भिंगारदिवे, सौरभ ढोकरीया, मनोज बलदोटा, डॉ. सुमित नलावडे, गणेश गावडे, बाळासाहेब निकम, निलेश वाघ, आशुतोष बांगर, अमित गटणे, मीना वाघ, वर्षा बोराडे, सुरेखा भिंगारदिवे, सुनिता आगरकर, शुभम गवळी, सारंग मुळे, रमेश हिवाळे, दीपक आडेप, दिग्विजय गावडे आदी नागरिक उपस्थित होते.
नागरिकांनी इशारा दिला आहे की, जर महानगरपालिकेने तातडीने डेपो हलविण्याचा निर्णय घेतला नाही, तर ठिय्या आंदोलन उभारण्यात येईल.