अहिल्यानगर (प्रतिनिधी):
राज्यातील वीज कंपन्यांचे सुरू असलेले खाजगीकरण आणि इतर धोरणात्मक निर्णयांविरोधात राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समितीने तीन दिवसांचा संप पुकारला आहे. या संपाला आजपासून (गुरुवारपासून) प्रारंभ झाला असून, अहिल्यानगरसह राज्यभरात या संपाचा परिणाम दिसू लागला आहे. अहिल्यानगरच्या महावितरण कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनात सुमारे सात प्रमुख संघटनांचा सहभाग आहे. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, महाराष्ट्र वीज कामगार महासंघ, सबॉर्डीनेट इंजिनियर असोसिएशन (म.रा.वि.मं.), महाराष्ट्र राज्य वीज कामगार काँग्रेस (इंटक), महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी विद्युत वर्कर्स युनियन आणि तांत्रिक कामगार यूनियन या संघटनांचा समावेश आहे.
संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी महावितरण कंपनीच्या कार्यक्षेत्रात समांतर वीज वितरण परवाना देण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. तसेच ३२९ उपकेंद्रे कंत्राटी पद्धतीने चालविण्यास देणे, महापारेषण कंपनीमधील २०० कोटींपेक्षा जास्त प्रकल्प TBCB माध्यमातून भांडवलदारांना देणे आणि महापारेषण कंपनीचा शेअर मार्केटमध्ये IPO लिस्टिंग करण्यास विरोध या प्रमुख मागण्या कृती समितीने मांडल्या आहेत.
अहिल्यानगर येथे झालेल्या आंदोलनावेळी महेश चाबुकस्वार, धीरज गायकवाड, राजेंद्र घोरपडे, सुशील तायडे, गणेश कुंभारे, गायकवाड डी.एस., राहुल वरंगटे, म्हस्के विजय, अनिल कुमार रोकडे, सतीश भुजबळ, धीरज भिंगारदिवे, रघुनाथ लाड यांच्यासह मोठ्या संख्येने अभियंते, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.