अहिल्यानगर (प्रतिनिधी)
शहरात येत्या ८ आणि ९ नोव्हेंबरला सेनापती बापट साहित्य संमेलन सुखकर्ता लॉन,कल्याण रोड येथे होणार आहे. यावेळी कवी आणि लेखक इंद्रजीत भालेराव हे संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत. ही माहिती संयोजक सचिन चोभे यांनी दिली. आत्मनिर्धार फाउंडेशन (निंबळक, ता. नगर) या संस्थेने संमेलनाचं आयोजन केले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना संयोजक चोभे म्हणाले, “स्वातंत्र्यसैनिक सेनापती बापट यांच्या विचारांना उजाळा देण्यासाठी यंदाच्या संमेलनाला त्यांचं नाव दिलं आहे. सध्या राज्यात ओला दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झालीये. शेतकरी आणि कष्टकरी वर्गावर संकट आलंय. त्यामुळे साहित्याच्या माध्यमातून त्यांच्या प्रश्नांवर चर्चा व्हावी म्हणून भालेरावांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.”
दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात काव्य संमेलन, व्याख्यान, परिसंवाद, लोककलांचे सादरीकरण असे विविध कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांचं नियोजन साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य बी. जी. शेखर आणि डॉ. राजेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली केलं जातंय. कार्याध्यक्ष ह. भ. प. सिद्धीनाथ मेटे महाराज म्हणाले, “संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी अनेक नावं चर्चेत होती. पण ग्रामीण भागाचं प्रतिनिधित्व करणारे, शेती-मातीशी नातं असलेले लेखक म्हणून भालेराव यांची सर्वानुमते निवड झाली.”
यावेळी बोलताना आत्मनिर्धार फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव गवळी म्हणाले, “या संमेलनाला जिल्हाभरातून उत्तम प्रतिसाद मिळतोय. शाळा, महाविद्यालयं, सरकारी कार्यालयं सगळीकडून सहकार्य मिळतंय. महिला साहित्यिकांना विशेष संधी देण्याचं आमचं प्रयत्न आहेत. विद्यार्थी आणि शिक्षकांचा सहभागही मोठ्या संख्येने होणार आहे.”
लेखक रामदास कोतकर यांनी सांगितलं, “जिल्ह्यातील सगळ्या साहित्यिक संस्थांशी संपर्क सुरू आहे. जुन्या आणि नव्या साहित्यिकांचा मेळ बसवून प्रत्येक सत्र रोचक बनवायचं ठरवलंय. या कार्यक्रमाचं यश सर्वांच्या सहकार्यावर अवलंबून आहे.”