अहिल्यानगर (प्रतिनिधी):
अहिल्यानगर तालुक्यातील जेऊर येथील लिटल वंडर स्कूल अँड विश्डम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव मनात ठेवत पूरग्रस्त बांधवांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. अलीकडील मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीने भारावून विद्यार्थी ‘मिशन माणुसकी’ या मोहिमेत सहभागी झाले. त्यांनी स्वतःहून मदत मोहिम राबवून समाजाप्रती संवेदनशीलतेचे आदर्श उदाहरण घालून दिले.
विद्यार्थ्यांनी आपल्या खिशातील पैसे वाचवून तसेच स्वतःचा खाऊ टाळून कपडे, वह्या, पुस्तके, अन्नधान्य आणि अन्य आवश्यक वस्तू जमा केल्या. काही विद्यार्थ्यांनी घराघरातून वापरण्यायोग्य साहित्य जमा करून शाळेत आणले. हे सर्व साहित्य शाळेच्या संचालिका स्वाती चेमटे आणि मुख्याध्यापक सुशिल खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित पॅक करून पूरग्रस्त भागात पाठविण्यात आले.
संचालिका स्वाती चेमटे म्हणाल्या, “लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण होणे, हीच खरी शिक्षणाची दिशा आहे. शिक्षण केवळ गुण मिळवण्यासाठी नसून, समाजासाठी काहीतरी करण्याची जाणीव देणारे असावे.” तर मुख्याध्यापक सुशिल खेडकर यांनी सांगितले, “लिटल वंडर स्कूलचे विद्यार्थी केवळ अभ्यासातच नव्हे, तर समाजकार्यातही आघाडीवर आहेत, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.”
या उपक्रमासाठी शिक्षक मनिषा क्षेत्रे, कल्पना वड्डेपल्ली, मुशरा खान, मिनाक्षी साळवे, आमरिन पठाण, डेव्हीड भोसले यांनी पुढाकार घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सहकार्यभाव, दयाभाव आणि मानवतेची जाणीव दृढ झाली. पालक आणि स्थानिक नागरिकांनीही विद्यार्थ्यांच्या या सामाजिक कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले.
दैनिक रयत समाचारच्या ‘मिशन माणुसकी’ आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत लिटल वंडर स्कूलच्या वतीने डेव्हिड भोसले यांनी पूरग्रस्तांसाठी संकलित साहित्य रयत समाचार कार्यालयात सुपूर्द केले. यावेळी उपसंपादक दिपक शिरसाठ, सहसंपादक तुषार सोनवणे, दिपक नेटके, संपतराव रोहोकले आदी मान्यवर उपस्थित होते.