अहिल्यानगर (प्रतिनिधी)
उंबरे गावातील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब दशरथ काळे यांनी चेडेगाव व चिंचोरे परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर मुरूम उत्खनन आणि वाहतुकीविरोधात कठोर कारवाईची मागणी करत आझाद मैदान, मुंबई येथे उपोषण सुरू केले आहे. अनेकदा तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी हे पाऊल उचलले.
काळे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, परिसरात मोठ्या प्रमाणात मुरूम उत्खनन सुरू असून काही वाहनांना क्रमांकही नाहीत, तरीसुद्धा ती विनाअडथळा रस्त्यावरून धावत आहेत. राहुरी पोलिस स्टेशनमध्ये वारंवार तक्रारी दिल्यानंतरही कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
उपोषणाच्या दरम्यान काही व्यक्तींनी उपोषण स्थळी येऊन काळे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचीही माहिती त्यांच्या निवेदनात देण्यात आली आहे. या संदर्भात सुनील आप्पासाहेब दुशिंग, प्रवीण भास्कर शिरसाट, बबलू उर्फ आकाश राजेंद्र ढोकणे, दीपक गोरक्षनाथ ढोकणे, अशोक दामोदर ढोकणे, आप्पासाहेब उर्फ साहेबराव रामदास दुशिंग आणि राजेंद्र नामदेव ढोकणे यांचा उल्लेख करण्यात आला आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच त्यांचे शस्त्र परवाने तात्काळ रद्द करून जमा करण्यात यावेत, अशी मागणी काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या वतीने आझाद मैदान उपोषणस्थळी देण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, बेकायदेशीर मुरूम उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध लवकरच कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि आरोपींच्या शस्त्र परवान्यांची रद्द प्रक्रिया सुरू आहे.