अहिल्यानगर | प्रतिनिधी
माजी सैनिकांना राजकीय आरक्षण मिळावे, यासाठी जय हिंद फाउंडेशन, अहिल्यानगर यांच्या वतीने पद्मश्री पोपटराव पवार यांना सरकारकडे शिफारस करण्याचे निवेदन देण्यात आले. या वेळी शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, अंबादास गोरे, राजू ठाणगे आदी उपस्थित होते.
या निवेदनात स्थानिक स्वराज्य संस्था, विधान परिषद आणि राज्यसभेत माजी सैनिकांसाठी आरक्षित जागा ठेवण्याची मागणी करण्यात आली. फाउंडेशनकडून सांगण्यात आले की, ग्रामपंचायत, नगरपरिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेत प्रत्येकी एक सदस्य माजी सैनिक असावा. तसेच राज्यपाल नियुक्त आमदारांमध्येही एक जागा सैनिकांसाठी राखीव ठेवावी.
शिक्षक मतदारसंघाप्रमाणे सैनिक मतदारसंघ तयार करून सातही विभागांतून सात सैनिक आमदार निवडले जावेत, विधान परिषद व राज्यसभेतही प्रत्येकी एक सैनिक प्रतिनिधी असावा, अशी मागणी जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.
पद्मश्री पोपटराव पवार यांनी या मागणीला पाठिंबा दर्शवला असून त्यांनी सांगितले की, “माजी सैनिकांमध्ये शिस्त, जबाबदारी आणि कार्यक्षमतेचे गुण आहेत. गावोगाव विकास प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढला पाहिजे.”
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हा परिषदेत पाच व पंचायत समितीत दोन स्वीकृत सदस्यांची व्यवस्था करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या सदस्यांमध्ये एक जागा माजी सैनिकांसाठी राखीव ठेवावी, अशीही मागणी जय हिंद फाउंडेशनने केली आहे.
शिवाजी पालवे यांनी सांगितले की, “अनेक माजी सैनिक सामाजिक कार्यात सक्रिय आहेत; मात्र आर्थिक अडचणीमुळे निवडणूक लढवू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या सेवेला मान देण्यासाठी स्वीकृत सदस्यपदाचे आरक्षण आवश्यक आहे.”