अहिल्यानगर (प्रतिनिधी)
स्वातंत्र्यसैनिक सेनापती बापट साहित्य संमेलन या नावाने येत्या ८ व ९ नोव्हेंबर २०२५ रोजी साहित्यप्रेमींसाठी एक मोठा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागांतर्गत साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या संमेलनाच्या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि साहित्यरसिकांना सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी या सेनापती बापट साहित्य संमेलन अंतर्गत निबंध, चित्रकला, कविता आणि वेशभूषा स्पर्धा घेण्यात येणार आहेत. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी ३ नोव्हेंबरपर्यंत आपली प्रवेशिका स्वहस्ते, पोस्ट, कुरिअर किंवा ईमेलद्वारे पाठविण्याचे आवाहन संयोजन समितीचे कार्याध्यक्ष ह. भ. प. सिद्धिनाथ मेटे महाराज यांनी केले आहे.
मेटे महाराज म्हणाले, “साहित्य संमेलन म्हणजे साहित्यिक आणि साहित्यरसिक यांना जोडणारा दुवा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्जनशील मंडळींना या स्पर्धांच्या माध्यमातून सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.”
स्पर्धेची प्रवेशिका aatmnirdharfoundation2014@gmail.com या ईमेलवर किंवा न्यू तिरंगा प्रिंटर्स, नालेगाव, अहिल्यानगर (पिन-४१४००१) या पत्त्यावर पाठवता येणार आहे. अधिक माहितीसाठी ९८२३९३४२४६ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
आत्मनिर्धार फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव गवळी (निंबळक) यांनी सांगितले की, पारनेरचे भूमीपुत्र सेनापती बापट यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि नगर जिल्ह्याच्या साहित्यिक चळवळीला नवी दिशा देण्यासाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचा आणि संस्थांचा सहभाग वाढवण्यासाठी सर्वाधिक सहभाग असणाऱ्या शाळांचा सन्मानदेखील करण्यात येणार आहे.
🖋️ चित्रकला आणि निबंध स्पर्धेचे विषय
निबंध लेखनासाठी २०० ते २५० शब्दांपर्यंत मर्यादा असून विषय —
1. सेनापती बापट यांचे विचार व कार्य
2. नगर जिल्ह्याचे साहित्य-संस्कृतीमधील योगदान
3. नगर जिल्ह्यातील कोणत्याही एका स्वातंत्र्यसैनिकावर आधारित लेखन
तर
चित्रकला स्पर्धेत —
1. सेनापती बापट किंवा
2. इतर स्वातंत्र्यसैनिक यांच्या भावमुद्रा
स्पर्धा चार गटांमध्ये (वय ५ ते २० वर्षे व खुला गट) होणार असून तालुकास्तर व जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यांचा साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येईल.
🎭 कविता लेखन आणि वेशभूषा स्पर्धा
‘सेनापती बापट यांचे विचार व कार्य’ या विषयावर विशेष कविता लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तसेच, ८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ८.३० ते ९.३० दरम्यान होणाऱ्या ग्रंथफेरी व ग्रंथदिंडी कार्यक्रमात वेशभूषा स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेचा विषय ‘भारतातील लेखक, महापुरुष आणि पारंपरिक वेशभूषा’ असा असेल.
दोन्ही स्पर्धांतील विजेत्यांचा जिल्हास्तरीय सन्मान करण्यात येणार असून अधिक माहिती ‘अहिल्यानगर साहित्य संमेलन’ (www.facebook.com/ahilyanagar.sahitya) या फेसबुक पेजवर पाहता येईल, असे महादेव गवळी यांनी सांगितले.