अहिल्यानगर | प्रतिनिधी
अहिल्यानगर दिवाळी खरेदीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. दोन दिवसांवर आलेल्या दिवाळी सणानिमित्त शहरात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. सायंकाळी मुख्य बाजारपेठा, कपड्यांची दुकाने आणि ज्वेलर्स दुकानांत नागरिकांची प्रचंड गर्दी दिसत आहे. अहिल्यानगर दिवाळी खरेदीसाठी सोनं-चांदी, कपडे आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर मोठी मागणी आहे. सोन्याचे दर गगनाला भिडलेले असतानाही नागरिकांचा कल सोन्या-चांदीच्या खरेदीकडेच दिसतोय. पारंपरिक सणांसह शुभमुहूर्त साधत अनेकांनी दागिने, नाणी आणि नवीन अलंकार खरेदी करून दिवाळीचा आनंद द्विगुणित केला आहे.
अहिल्यानगर दिवाळी खरेदीमध्ये कपड्यांसह इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंनाही मोठी मागणी वाढली आहे. विविध कंपन्यांनी आकर्षक ऑफर्स आणि सवलती जाहीर केल्याने नागरिकांची गर्दी मोबाइल, टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन आणि गृहउपयोगी वस्तूंच्या दुकानांकडे वळली आहे. याशिवाय इलेक्ट्रिक वाहनांकडेही नागरिकांचा वाढता कल दिसतोय. त्यामुळे शहरातील टू-व्हीलर आणि फोर-व्हीलर शोरूमसमोर वाहन खरेदीदारांची झुंबड उडाली आहे.

दरम्यान, या वाढत्या अहिल्यानगर दिवाळी खरेदीमुळे शहरातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. मुख्य बाजारपेठा, तारकपूर रोड आणि सर्जेपुरा मार्गावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. सर्जेपुरा मार्गावर रस्त्याचे काम सुरू असल्याने सिंगल लाईन वाहतूक सुरु आहे. त्यामुळे उपनगरातून शहरात येणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागत आहे. गर्दीमुळे पायी चालणेही कठीण झाले असून नागरिक त्रस्त झाले आहेत.
यावर्षी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असले तरी दिवाळी साजरी करण्याच्या नागरिकांच्या उत्साहात किंचितही कमीपणा नाही. दुकाने, बाजारपेठा आणि गल्लीबोळ दिवाळीच्या रोषणाईने उजळले आहेत. मात्र, वाढत्या गर्दी आणि वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून प्रशासनाकडे होत आहे.