पुणे | प्रतिनिधी
पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा परिसरात काही महिलांनी नमाज पठण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देत म्हटलं, “शनिवार वाडा हा मराठा साम्राज्याचा वारसा आहे, येथे अशा धार्मिक कृतींना जागा नाही.” त्यांच्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली डोंगरे यांनी प्रत्युत्तर देत थेट हल्लाबोल केला आणि विचारला, “शनिवार वाडा त्यांच्या बापाचा आहे का?”
व्हिडिओ १९ ऑक्टोबर रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर मेधा कुलकर्णी प्रत्यक्ष शनिवार वाडा परिसरात भेट देऊन नाराजी व्यक्त केली. “इतिहास आणि संस्कृती जपणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. येथे कोणतीही धार्मिक कृती चालू नये,” असे त्या म्हणाल्या.
रुपाली डोंगरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, “पुण्यातील महिलांनी नमाज पठण केल्याने कोणाच्याही श्रद्धेला धक्का बसत नाही. मात्र, एका लोकप्रतिनिधीकडून धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य अपेक्षित नाही. शनिवार वाडा सर्वांचा आहे, कोणाच्याही बापाची मालमत्ता नाही.” त्यांच्या या विधानामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे.
या घटनेनंतर पुणे पोलिसांनी अज्ञात महिलांविरोधात गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरू आहे. नागरिकांमध्ये या विषयावर मतभेद दिसून येत आहेत. काहींच्या मते, ऐतिहासिक स्थळांवर धार्मिक कृतींसाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वं ठरवली पाहिजेत, जेणेकरून भविष्यात अशा वादांना आळा बसेल.