अहिल्यानगर | प्रतिनिधी
हिंदू संस्कृतीतील सर्वात मोठा सण असलेल्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर समाजातील वंचित, वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींना आनंदाचा क्षण अनुभवता यावा, यासाठी पद्मशाली युवाशक्ती ट्रस्टतर्फे फराळ वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. मागील दहा वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा यंदाही कायम ठेवत ट्रस्टचे युवक सकाळी ९ वाजल्यापासून शहरातील विविध भागांमध्ये जाऊन लाभार्थ्यांच्या घरी फराळ पोहोचवित होते.
पद्मशाली युवाशक्तीचे श्रीनिवास इप्पलपेल्ली यांनी सांगितले की, “दरवर्षीप्रमाणे या वर्षीही ट्रस्टच्या युवकांनी स्वतःहून घराघरांत जाऊन वंचित, वृद्ध आणि दिव्यांगांना फराळ पोहोचवला. दिवाळीच्या शुभेच्छा, आपुलकी आणि माणुसकीचं हेच खरं प्रतीक आहे.”

या वेळी लाभार्थ्यांनीही भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. एका वृद्ध महिलेने सांगितले, “दरवर्षी या दिवशी आमच्या माहेरहून कोणी तरी भेटायला येतात असं वाटतं. आमच्यासाठी हीच खरी दिवाळी असते.”
फराळ वितरण उपक्रमात योगेश म्याकल, अजय म्याना, दीपक गुंडू, योगेश ताटी, सागर बोगा, सागर आरकल, सागर मेहसुनी, विराज म्याना, वेदांत म्याना यांसह ट्रस्टचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. दिवाळीच्या काळात समाजातील सर्व घटकांपर्यंत आनंद पोहोचवण्याचा हा उपक्रम ‘आपुलकीची दिवाळी’ म्हणून ओळखला जात आहे.
👉 तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडी व ताजे अपडेट्स वाचण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा:
🔗 https://ahilyanagar24live.com/