अहिल्यानगर | प्रतिनिधी
खड्डे आणि महामार्ग हे आता अविभाज्य झाले आहेत, असं म्हणावं लागेल! नगर–मनमाड महामार्गावरील रस्त्यांची अवस्था इतकी बिकट झाली आहे की, रोज कुणी ना कुणी अपघातग्रस्त होत आहे. असाच एक प्रकार नेवासा तालुक्यातील तरुण कार्तिक पासलकर यांच्या बाबतीत घडला आहे. 28 ऑक्टोबरच्या रात्री साडेदहाच्या सुमारास तो आपल्या TVS Raider (MH17 DK1347) या दुचाकीवरून अहिल्यानगर वरून राहुरी ला जात असताना मारुती मंदिर परिसरात एका मोठ्या खड्ड्यात गाडी आदळली. अचानक बसलेल्या धक्क्याने पुढील रिंग तुटली आणि कार्तिकचा तोल जाऊन तो खाली पडला. त्याच्या पायाला दुखापत झाली, तर गाडीचेही मोठे नुकसान झाले.

पुढच्या दिवशी कार्तिकने थेट सावेडी येथील TVS शोरूममध्ये जाऊन जबाब मागितला. मात्र, अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितले की गाडीची गुणवत्ता चांगली असून नुकसान हे खड्ड्यांमुळे अपघात झाल्यामुळेच झाले आहे. या उत्तरानंतर कार्तिक आणखी संतप्त झाला आणि त्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई-मेल पाठवला. त्या मेलमध्ये त्याने अपघाताची सविस्तर माहिती देऊन वाहनाच्या दुरुस्तीचा खर्च शासनाकडून भरावा आणि नगर–मनमाड महामार्गाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे.
कार्तिकने आपल्या तक्रारीत असेही नमूद केले आहे की, या रस्त्यावर दररोज हजारो वाहने ये-जा करतात, मात्र खड्ड्यांमुळे अपघात सतत होत आहेत. या खड्ड्यांकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासनाने डोळेझाक केली आहे. “जनतेच्या जीवाशी खेळ चालला आहे, रस्ते दुरुस्त नसतील तर लोकांनी कर कशासाठी द्यायचा?” असा संतप्त सवाल त्याने उपस्थित केला आहे.

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे. रस्त्यांची दुरवस्था पाहता नेहमीच अपघात होत असतात. सार्वजनिक बांधकाम विभाग तात्पुरती डागडुजी करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करीत आहे असे मत स्थानिक नागरिकांनी मांडले. काही रहिवाशांनी प्रशासनाने त्वरित लक्ष न दिल्यास रस्तारोकोसारख्या तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
आता कार्तिकच्या या तक्रारीवर शासन आणि स्थानिक प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नवीन बातम्यांसाठी http://Agilyanagar24live.com ला क्लिक करा.