Ahilyanagar24Live | अहिल्यानगर | 1 नोव्हेंबर 2025
शहरातील वाहतूक कोंडी आता नित्याचीच झाली असून माळीवाडा, सर्जेपुरा, तसेच पत्रकार चौक ते डीएसपी चौक या दरम्यान दररोज वाहनांची प्रचंड गर्दी होत आहे. या सततच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनात प्रचंड अडथळे निर्माण होत आहेत. वाहतूक कोंडी या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले असून शहरातील प्रमुख रस्त्यांवर प्रवास करणे नागरिकांसाठी एक मोठे आव्हान बनले आहे.
तारापूर परिसरात असलेल्या मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये येमर्जंसी पेशंट घेऊन जाणाऱ्या ॲम्ब्युलन्सला वेळेत रुग्णालयात पोहोचता येत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. नागरिक सांगतात की, दररोज सकाळ-संध्याकाळ या ठिकाणी वाहनांची रांग इतकी वाढते की पायी चालणाऱ्यांना देखील रस्ता ओलांडणे कठीण होते. विशेषतः तारापूर बसस्टँडवरून जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना या अडथळ्यांच्या शर्यतीतून मार्ग काढणे हे अवघड झाले आहे.
वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांचा ताफा असला तरी गर्दीचा ताण इतका वाढला आहे की सध्याच्या उपाययोजना अपुऱ्या ठरत आहेत. नागरिकांच्या म्हणण्यानुसार या वाहतूक कोंडी समस्येवर प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करून पर्यायी मार्ग, सिग्नल नियोजन आणि पार्किंग नियंत्रण यावर ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.
नवीन बातम्यांसाठी 👉 http://Ahilyanagar24Live.com