मंदिर पाडल्याने धार्मिक भावना दुखावल्या; आ. संग्राम जगताप यांच्यासह ट्रस्टींवर तक्रार दाखल

अहिल्यानगर |Ahilyanagar24live.com| प्रतिनिधी

येथील श्री ऋषभ संभव जिन जैन श्वेतांबर संघ (जैन मंदिर), कापड बाजार यांच्या मालकीच्या स्टेशन रोडवरील अक्षता गार्डन समोरील भूखंडावरील मंदिर व प्रवचन स्थळ संगनमत करून पाडल्याच्या प्रकरणी माजी आमदार संग्राम अरुण जगताप, गणेश हरिभाऊ गोंडाळ, तसेच ट्रस्ट अध्यक्ष सुभाष झुंबरलाल मुथा व अन्य ट्रस्टी यांच्या विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ही तक्रार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख किरण काळे आणि जैन समाजाचे मनोज सुवालाल गुंदेचा यांनी दाखल केली असून, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्याकडे या प्रकरणी तातडीने सखोल तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे.

गुरुवारी पत्रकार परिषदेत माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि खासदार निलेश लंके यांनी तक्रार दाखल करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर ही अधिकृत तक्रार नोंदवण्यात आली आहे.

तक्रारीनुसार, स्टेशन रोडवरील वॉर्ड क्र. २१ मधील फायनल प्लॉट क्र. ११९ (क्षेत्रफळ ४७१.९९ चौरस मीटर) हा भूखंड ट्रस्टच्या नावावर आहे. अहमदनगर नगरपालिका (सध्या अहिल्यानगर महानगरपालिका) यांच्या नोंदीनुसार या भूखंडावर मंदिर अस्तित्वात होते. त्याचे अधिकृत पुरावेही पोलिसांना सादर करण्यात आले आहेत.

तक्रारीत नमूद आहे की, जैन धर्माचे तीर्थंकर भगवान ऋषभनाथ व भगवान महावीर यांच्या शिकवणींवर आधारित हे मंदिर जैन समाजासाठी धार्मिक श्रद्धेचे प्रतीक होते. मात्र, ते पाडल्याने समाजाच्या भावना खोलवर दुखावल्या गेल्या आहेत.

भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २९८ नुसार धार्मिक स्थळाला हानी पोहोचविणे हे दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा आहे. यासाठी दोन वर्षांपर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते. त्यामुळे दोषींवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

 

नवीन बातम्यांसाठी 👉 http://Ahilyanagar24Live.com

2 thoughts on “मंदिर पाडल्याने धार्मिक भावना दुखावल्या; आ. संग्राम जगताप यांच्यासह ट्रस्टींवर तक्रार दाखल

  1. लोकशाहीमध्ये जो लोकशाही वाकऊ शकतो, तोच नेता असतो.

  2. लोकशाहीमध्ये जो लोकशाही वाकवू शकतो, तोच नेता असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!