अहिल्यानगर | ९ नोव्हेंबर २०२५
अहिल्यानगर जिल्ह्याचे भूषण आणि शिक्षण क्षेत्रातील तेजस्वी व्यक्तिमत्त्व असलेले माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांच्या ‘अमृत महोत्सवा’चा सोहळा १४ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता सहकार सभागृहात संपन्न होणार आहे. या प्रसंगी “कुलगुरू” आणि “शिक्षण आणि विकास” हे दोन ग्रंथ प्रकाशित होणार आहेत.
जिल्ह्यासाठी १४ नोव्हेंबर २०२५ ही तारीख विशेष ठरणार आहे. शिक्षणाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांचे जीवन उजळविणारे आणि दोन विद्यापीठांचे कुलगुरू म्हणून कार्य करणारे डॉ. सर्जेराव निमसे यांचा ‘अमृत महोत्सव सोहळा’ या दिवशी साजरा होणार आहे.
हा कार्यक्रम डॉ. निमसे सरांच्या माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केला असून, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावचे संस्थापक कुलगुरू डॉ. एन. के. ठाकरे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात दहा-बारा आजी-माजी कुलगुरू सहभागी होणार असून, शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांसाठी हा एक प्रेरणादायी सोहळा ठरणार आहे.
डॉ. निमसे यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि लखनऊ विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम पाहिले आहे. गणित या विषयात डॉक्टरेट प्राप्त करून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षणासाठी अर्पण केले. विशेष म्हणजे त्यांनी लखनऊ विद्यापीठाच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला, ज्यातून त्यांच्या राष्ट्रनिष्ठेचा आणि प्रेरणादायी कार्याचा प्रत्यय येतो.
या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने प्रकाशित होणारी “कुलगुरू” आणि “शिक्षण आणि विकास” ही दोन्ही पुस्तके शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरतील. हा सोहळा म्हणजे केवळ एका व्यक्तीचा गौरव नसून संपूर्ण शिक्षण क्षेत्रातील आदर्श शिक्षकांचा सन्मान आहे.
कार्यक्रम दिनांक: १४ नोव्हेंबर २०२५ (शुक्रवार)
वेळ: सकाळी १० वाजता
ठिकाण: सहकार सभागृह, अहिल्यानगर
नविन बातम्यांसाठी 👉 http://Ahilyanagar24live.com