📍अहिल्यानगर | ९ नोव्हेंबर २०२५
शहरातील तेलीखुंट परिसरातील अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. माजी नगरसेविका अश्विनी जाधव यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हे काम मार्गी लागले असून, स्थानिक व्यापारी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
तेलीखुंट परिसरातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम अखेर सुरू झाले आहे. या विकासकामाचे उद्घाटन शहरातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
कार्यक्रमाला शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख सचिन जाधव, अकबर अली शेख, जुनेद शेख, बाबू मध्यान, राजेश चंगेडिया, शोएब शेख, एजाज शेख आणि शंकर कटारिया आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी बोलताना जाधव म्हणाले, “शहरातील बाजारपेठेला जोडणारे रस्ते हे व्यापारी आणि ग्राहक वर्गासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. पक्षाच्या माध्यमातून ही कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. महायुती सरकारच्या काळात नगरच्या विकासाला गती मिळाली असून, आम्ही रस्ते, पाणी, ड्रेनेज आणि स्वच्छता या सर्व क्षेत्रांत ठोस पावले उचलली आहेत.”
तेलीखुंट येथील रस्त्याची दुरावस्था गेल्या काही वर्षांपासून नागरिकांसाठी त्रासदायक ठरत होती. विशेषतः पावसाळ्यात वाहतूक आणि खरेदीसाठी ये-जा करणे कठीण झाले होते. पावसाळा संपल्यानंतर लगेचच या कामाला गती देण्यात आली आहे, असे जाधव यांनी सांगितले.
अकबर अली शेख यांनी सांगितले की, “या रस्त्यामुळे बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांना आणि बाहेरगावाहून येणाऱ्या ग्राहकांना मोठी सोय होईल. चांगले रस्ते हे शहराची ओळख उंचावतात, आणि त्याच दिशेने हे काम होत आहे.”
या कामामुळे केवळ वाहतुकीची सुलभता नाही, तर परिसराच्या सौंदर्यातही भर पडेल, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. प्रलंबित काम मार्गी लावल्याबद्दल स्थानिकांनी माजी नगरसेविका अश्विनी जाधव यांचे आभार मानले.
नविन बातम्यांसाठी 👉 ahilyanagar24live@gmail.com