नगर तालुका | प्रतिनिधी
नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या वाढत्या हालचालींमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळ-संध्याकाळच्या वेळी बिबट्या शेतात आणि बागेत दिसल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत आणि वनविभागाकडे नोंदवल्या होत्या. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
या तक्रारींची दखल घेत वनविभागाने तातडीने कारवाई केली सुरक्षेसाठी विशेष पथक तैनात केले असून बुधवारी (ता.१९) गावालगतच्या एका बागेत मोठ्या आकाराचा पिंजरा बसवून बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. विशेष म्हणजे ग्रामपंचायत सदस्य सुधीर गायकवाड यांनी स्वखर्चाने नांदगाव येथून हा पिंजरा आणण्यासाठी पुढाकार घेतला.
वनरक्षक श्रीहरी आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण भालके, शिवाजी गायकवाड, विराग गायकवाड, विजय खळेकर, रवींद्र गायकवाड, तुषार शिंदे, शुभम गायकवाड, महेश गायकवाड आणि सुशील गायकवाड यांनी सहकार्य केले.
वनविभागाने ग्रामस्थांना सावध राहण्याचे आणि अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे. पिंजऱ्यात सतत निरीक्षण ठेवण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले असून बिबट्या पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
नविन बातम्यांसाठी 👉 http://ahilyanagar24live.com