अहिल्यानगर | प्रतिनिधी
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने आगामी महानगरपालिका निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली असून, राष्ट्रवादी भवनात ‘विजय संकल्प मेळावा’ संपन्न झाला. या मेळाव्यात कार्यकर्त्यांची उपस्थिती आणि तरुणाईचा प्रचंड उत्साह लक्षवेधी ठरला. जिल्हाध्यक्ष दादाभाऊ कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीस शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, विधानसभा अध्यक्ष निलेश मालपाणी, महिला शहराध्यक्षा नलिनी गायकवाड यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हजेरी लावली.
मेळाव्यात १७ प्रभागांत महाविकास आघाडीसोबत समन्वयाने निवडणूक लढविण्याचा पर्याय, तसेच गरज पडल्यास स्वबळावर लढण्याची तयारी यावरही सविस्तर चर्चा झाली. इच्छुक उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह शक्तिप्रदर्शन करून निवडणुकीचे वातावरण तापवले.
जिल्हाध्यक्ष दादाभाऊ कळमकर म्हणाले, “कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे पक्षाची ताकद स्पष्ट होते. स्थानिक प्रश्नांवर प्रामाणिक काम करणाऱ्यांनाच तिकीट मिळणार. गरज पडली तर पक्ष स्वबळावरही पूर्णपणे लढण्यास समर्थ आहे.”
शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी स्पष्ट केले, “महानगरपालिका निवडणूक म्हणजे स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांची खरी लढाई. ती सोडवण्याची क्षमता ज्यांच्यात आहे, त्यांनाच तिकीट मिळेल.”
लवकरच पक्षाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत अंतिम रणनिती बैठकीचे आयोजन होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीच्या या मेळाव्याने आगामी महानगरपालिका निवडणुकीत पक्षाच्या तयारीला वेग मिळाला असून शहरात निवडणूक रणधुमाळी सुरू झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
नवीन बातम्यांसाठी 👉 http://Ahilyanagar24live.com
✍️ Ahilyanagar24Live Political Desk