पर्थ | प्रतिनिधी
ॲशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला आज रोमांचक सुरुवात झाली. पहिलाच दिवस गोलंदाजांच्या नावे राहिला. ऑस्ट्रेलियाच्या मिशेल स्टार्क आणि इंग्लंडच्या बेन स्टोक्स यांनी केलेल्या वादळी गोलंदाजीपुढे दोन्ही संघांचे फलंदाज गुडघे टेकताना दिसले. दिवसअखेरीस मैदानावर तब्बल 19 विकेट पडल्या.
इंग्लंडचा संघ पहिल्या डावात केवळ 172 धावांवर गडगडला. स्टार्कने एकट्याने 7 विकेट घेत इंग्लंडच्या फलंदाजीची वाट लावली. ओली पोप (46) आणि हॅरी ब्रुक (52) या दोघांखेरीज अन्य कोणीही मोठी कामगिरी करू शकला नाही. 39 धावांवर इंग्लंडच्या तीन विकेट पडल्यावर या दोघांनी 55 धावांची भागीदारी करत डाव उभा करण्याचा प्रयत्न केला; मात्र मध्यफळी आणि तळातील फलंदाज स्टार्कच्या अचूक माऱ्यापुढे टिकले नाहीत.
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव तर आणखीच नाजूक स्थितीत सापडला. जोफ्रा आर्चर आणि ब्रायडन कार्स यांच्या अचूक माऱ्याने टॉप ऑर्डर हादरून गेली. 31 धावांवर चार विकेट पडल्यावर ट्रेविस हेड (21) आणि कॅमेरुन ग्रीन (24) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला; परंतु यश मिळाले नाही. दिवसअखेरीस ऑस्ट्रेलिया 9 बाद 123 या स्थितीत होता.
या सामन्यात गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने जबरदस्त गोलंदाजी करत 5 विकेट घेतल्या आणि ऑस्ट्रेलियाचा डाव अक्षरशः उद्ध्वस्त केला.
संघ पहिला डाव
इंग्लंड 172 धावा
ऑस्ट्रेलिया 9 बाद 123
➡️ मिशेल स्टार्क — 7 विकेट
➡️ बेन स्टोक्स — 5 विकेट
➡️ पहिल्या दिवशी एकूण पडलेल्या विकेट्स — 19
नविन बातम्यांसाठी 👉 http://Ahilyanagar24live.com
🖊 Ahilyanagar24Live Sports Desk