श्रीगोंदा | प्रतिनिधी
जिद्द, कष्ट आणि आत्मविश्वास असेल तर ग्रामीण भागातील साध्या सुरुवातीपासूनही स्वप्नं थेट राष्ट्रीय पातळीवर झेप घेतात, याचे प्रेरणादायी उदाहरण देवदैठण (ता. श्रीगोंदे) येथील १७ वर्षीय जान्हवी मल्हारी वाघमारे हिने घालून दिले आहे. नुकत्याच रत्नागिरीच्या डेरवण येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत (19 वर्षे वयोगट) पुणे विभागाचे प्रतिनिधित्व करत जान्हवीने दोन पदके पटकावली आहेत.
तिने तिहेरी उडीत ११.३० मीटर अशी शानदार कामगिरी करत रौप्यपदक मिळवले, तर लांबउडीत ५.०९ मीटर उडी मारत कांस्यपदकावर नाव कोरले. तिच्या या दुहेरी यशामुळे आता २६ ते ३० नोव्हेंबरदरम्यान हरियाणामध्ये होणाऱ्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.
जान्हवीच्या या यशामागे तिचा सातत्यपूर्ण सराव, कठोर अनुशासन आणि ‘मी करू शकते!’ हा अढळ आत्मविश्वास कारणीभूत असल्याचे तिचे मार्गदर्शक आणि क्रीडा शिक्षक संदीप घावटे यांनी सांगितले. शाळेचे प्राचार्य गुरुदत्त पाचर्णे, प्राचार्य विशाल डोके, पर्यवेक्षक नामदेव डुंबरे, मार्गदर्शक सचिन रासकर तसेच ग्रामस्थांचा आधार आणि कुटुंबियांचा पाठिंबा हेही तितकेच महत्त्वाचे ठरले.
आर्थिक अडचणी, मर्यादित प्रशिक्षण सुविधा आणि ग्रामीण पार्श्वभूमी असूनही जान्हवीने आपल्या जिद्दीच्या जोरावर सातत्य कायम ठेवत राज्यपातळीवर यश मिळवले आहे. तिच्या मेहनतीला आता राष्ट्रीय रंगमंचावर झळाळी मिळणार आहे.
राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या तर्फे आपण चमकून राज्याचे नाव उज्ज्वल करू, अशी आशा व्यक्त करत गावकऱ्यांनी जान्हवीचे मनापासून अभिनंदन केले आहे.
नवीन बातम्यांसाठी 👉 http://Ahilyanagar24live.com
✍️ Ahilyanagar24Live Sports Desk