मुंबई | 28 नोव्हेंबर 2025
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी बातमी समोर आली असून, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आगामी महानगरपालिका निवडणुका एकत्र लढवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मुंबईसह ठाणे, पुणे, नाशिक, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई या सहा मोठ्या महानगरपालिकांमध्ये आता दोन्ही पक्ष एकाच चिन्हाखाली नाही, पण एका रणनीतीने निवडणूक लढवणार आहेत.
हा निर्णय शिवतीर्थ येथील भेटीत झाला, जिथे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात जवळपास दोन तास चर्चा झाली. विशेष म्हणजे या चर्चेत मराठी मतांच्या एकत्रीकरणावर प्राधान्य देण्यात आले. स्थानिक मराठीबहुल भागांमध्ये मजबूत उमेदवारांची निवड आणि संघटनात्मक ताकद पाहून जागा वाटप करण्याचे दोन्ही पक्षांत ठरले आहे.
जागा वाटपासाठी जबाबदारी:
ठाण्यासाठी — शिवसेनेतर्फे राजन विचारे, मनसेतर्फे अविनाश जाधव
कल्याण-डोंबिवलीसाठी — शिवसेनेकडून वरुण सरदेसाई, मनसेतर्फे माजी आमदार राजू पाटील
मुंबईतील दादर, माहिम, वरळी, शिवडी, भायखळा आणि भांडूपसारख्या मराठीबहुल प्रभागांवर सर्वाधिक रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. मनसेला आपली मराठी मतदारांवरील पकड दाखवायची आहे, तर ठाकरेंची शिवसेना विद्यमान नगरसेवकांच्या जागा सोडायला तयार नाही.
ज्या भागात मजबूत उमेदवार आणि कार्यकर्त्यांची पकड असेल, त्या ठिकाणची जागा त्या पक्षाकडेच राहील,” अशी माहिती सूत्रांनी दिली.युतीमुळे मुंबई महापालिका निवडणुका अधिक रंगतदार होणार असून, भाजप आणि शिंदे गटावर ठाकरे बंधूंनी मोठा दबाव टाकला आहे. राजकीय वर्तुळात ही ‘मराठी मतांसाठी एकत्रित निर्णायक चाल’ म्हणून पाहिली जात आहे.
🗳️ या महानगरपालिकांमध्ये युती होणार:
✔ मुंबई
✔ ठाणे
✔ पुणे
✔ नाशिक
✔ कल्याण-डोंबिवली
✔ नवी मुंबई