मुंबई| १४ डिसेंबर २०२५
अर्जेंटिनाला विश्वविजेतेपद मिळवून देणारा जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून, दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी तो मुंबईत दाखल झाला. क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या वानखेडे स्टेडियममध्ये मेस्सीच्या आगमनाने फुटबॉलप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला.
सायंकाळी सुमारे सहा वाजता मेस्सी स्टेडियममध्ये दाखल होताच संपूर्ण परिसर ‘मेस्सी… मेस्सी…’ च्या जयघोषाने दणाणून गेला. चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती. यावेळी भारताचा दिग्गज फुटबॉलपटू सुनील छेत्री याच्याशी मेस्सीने भेट घेतली. दोघांनी एकमेकांना मिठी मारत शुभेच्छा दिल्या.
यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लिओनेल मेस्सी यांच्या हस्ते राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘प्रोजेक्ट महादेवा’ या फुटबॉल विकास प्रकल्पाचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मेस्सीचा सन्मान करत त्याला स्मृतिचिन्ह प्रदान केले.
यावेळी भारतरत्न सचिन तेंडुलकर देखील उपस्थित होते. सचिन तेंडुलकर यांनी मेस्सीला स्वतःचा १० नंबरचा जर्सी भेट दिली. क्रिकेट आणि फुटबॉल या दोन खेळांचे दिग्गज एकाच व्यासपीठावर पाहण्याचा ऐतिहासिक क्षण यावेळी चाहत्यांनी अनुभवला.
‘प्रोजेक्ट महादेवा’ अंतर्गत १३ वर्षांखालील ६० गुणवंत फुटबॉलपटूंची निवड करण्यात आली असून, त्यांना शिष्यवृत्ती व विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. यावेळी मेस्सीने या खेळाडूंशी संवाद साधत फुटबॉलमधील शिस्त, तंत्र आणि यशासाठी आवश्यक असलेल्या मानसिकतेबाबत मार्गदर्शन केले.
या प्रकल्पामुळे भारतातील फुटबॉलचा पाया अधिक मजबूत होईल आणि भविष्यातील दर्जेदार खेळाडू घडतील, असा विश्वास राज्य सरकारकडून व्यक्त करण्यात आला आहे.
नविन बातम्यांसाठी 👉 http://Ahilyanagar24live.com