पुणे | ६ जानेवारी २०२६
पुण्याचे माजी खासदार व माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे आज निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. आज दुपारी दोन वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव पुण्यातील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले असून, सायंकाळी अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनाने पुणे शहरासह देशाच्या राजकारणात एक प्रभावी पर्व संपले आहे.
काँग्रेस सत्तेत असताना केंद्रीय मंत्रिपद भूषवलेले सुरेश कलमाडी पुण्याच्या राजकारणातील एक वजनदार नाव होते. त्यांच्या मागे मोठा समर्थक वर्ग होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून ते सक्रिय राजकारणापासून दूर होते.
पायलट ते राजकारणी असा थक्क करणारा प्रवास
१ मे १९४४ रोजी जन्मलेल्या सुरेश कलमाडी यांचे शिक्षण सेंट व्हिन्सेंट हायस्कूल व फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. १९६० साली त्यांनी एनडीएमधून भारतीय वायूसेनेत प्रवेश केला. १९६५ व १९७१ च्या भारत-पाक युद्धात त्यांनी पायलट म्हणून सक्रिय सहभाग घेतला. स्क्वॉड्रन लीडर पदावरून १९७४ साली त्यांनी लवकर निवृत्ती स्वीकारली.
राजकारणातील दबदबा
७०च्या दशकात काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी पुणे काँग्रेसवर आपली पकड मजबूत केली. १९९१ नंतर पुण्यात काँग्रेसवर त्यांचा वरदहस्त राहिला. १९९७ मध्ये काँग्रेस सोडल्यानंतर १९९८ मध्ये अपक्ष म्हणून राज्यसभा निवडणूक जिंकत त्यांनी देशभरात खळबळ उडवून दिली. त्या निवडणुकीनंतरच शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्याची राजकीय चर्चा आजही होते.
ते सलग सुमारे ३० वर्षे संसदेत सक्रिय होते. पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी रेल्वेमंत्री म्हणूनही काम पाहिले.
घसरणीची सुरुवात आणि राजकारणापासून दूरावण
२०१० साली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळा प्रकरणामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा लागली. या प्रकरणात त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. त्यानंतर ते हळूहळू सार्वजनिक जीवनातून दूर गेले.
पुणे फेस्टिव्हलचे शिल्पकार
पुणे शहरात अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या पुणे फेस्टिव्हलचे ते ३२ वर्षे प्रमुख आयोजक होते. भारतीय खेळांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले होते.
सुरेश कलमाडी यांच्या निधनाने पुण्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय विश्वात शोककळा पसरली आहे.
नविन बातम्यांसाठी 👉 http://Ahilyanagar24live.com