मुंबई | प्रतिनिधी
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षलागवड, संवर्धन कार्यक्रमाचा राज्यभर उपक्रम.
शिक्षक हा समाजाचा कणा असून त्यांच्या प्रश्नांवर ठामपणे उभे राहण्याची हमी आपण घेतली आहे. शिक्षकांच्या पाठीशी हिमालयासारखा थंड न राहता सह्याद्रीसारखा मजबूतपणे मी उभा राहीन, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिक्षकसेनेच्या वतीने प्रांताध्यक्ष आमदार ज. मो. अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली २७ जून ते २७ जुलै दरम्यान राज्यभर वृक्षलागवड व संवर्धन कार्यक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यालाही सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले. शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. अंबादास शिंदे यांच्या पाठीवर स्वतः उद्धव ठाकरे व प्रांताध्यक्ष अभ्यंकर यांनी शाबासकीची थाप देत जिल्हा संघटनेच्या कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे आयोजन दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृहात करण्यात आले. यावेळी आमदार अभ्यंकर यांच्या आमदारकीच्या वर्षपूर्ती निमित्ताने त्यांच्या वार्षिक कार्य अहवालाचे प्रकाशनही करण्यात आले. या कार्यक्रमास शिवसेनेचे नेते, खासदार, मंत्री, राज्यातील विविध शिक्षक प्रतिनिधी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.