अहिल्यानगर | प्रतिनिधी
आजारपणाच्या काळात विरोधकांनी पसरवलेल्या अफवेमुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. याबाबत बोलताना आमदार शिवाजीराव कर्डीले भावनाविवश झाले. ते म्हणाले, “मी कार्यकर्त्यांमध्ये राहिलो तर लवकर बरा होईन म्हणून डॉक्टरांनी मला परवानगी दिली आहे. मी पुन्हा सक्रिय झालो असून रोज जनता दरबार घेणार आहे.”
चिचोंडी पाटील व नेप्ती उपबाजार समिती येथे कांद्याच्या शेडचे भूमिपूजन होणार आहे. या संदर्भातील नियोजन बैठक आ. शिवाजीराव कर्डीले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी भानुदास कोतकर, अक्षय कर्डीले, दिलीप भालसिंग, भाऊसाहेब बोठे, रभाजी सुळ आदी मान्यवर उपस्थित होते.
आ. कर्डीले म्हणाले की, या बाजार समित्यांमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. कांदा मार्केटच्या विस्तारासाठी सात एकर जागेत शेड उभारण्यात येणार आहे. या दोन्ही कामांचे भूमिपूजन मंत्री जयकुमार रावल व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमासाठी माजी आमदार बबनराव पाचपुते, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आ. विक्रम पाचपुते यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमास मोठ्या संख्येने कार्यकर्ते हजर होते. प्रास्ताविक संतोष म्हस्के यांनी केले तर आभार प्रदर्शन सुधीर भापकर यांनी मानले.