पाथर्डी |तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील धायतडकवाडी शिवारात बोरीच्या ओढ्यात शुक्रवारी सायंकाळी दुचाकीसह वाहून गेलेले तीनखडी (ता.पाथर्डी) येथील सेवानिवृत्त शिक्षक पांडुरंग निवृत्ती आंधळे (वय 72 ) यांचा शनिवारी पहाटे मृतदेह जोगेश्वरी मंदिराजवळ आढळून आला.
पांडुरंग आंधळे शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पाथर्डीवरून दुचाकीने आपल्या गावाकडे जात असताना धायतडकवाडी हद्दीतील बोरीच्या ओढ्यात दुचाकीसह वाहून गेले. दरम्यान, त्या वेळेस मोहटादेवी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्याला मोठा पूर आला होता. पुलावरून पाणी वाहत असतानाही आंधळे यांनी दुचाकीवरून रस्त्यावरील पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र पुलावरून जाणार्या पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते दुचाकीसह वाहून गेले.घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने प्रशासनाला कळविले.
तहसीलदार उध्दव नाईक, पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी तत्काळ पथकासह शोधकार्य सुरू केले. मात्र रात्री अंधार आणि पाण्याचा जोरदार प्रवाह यामुळे शोध मोहिमेत अडथळे आले. शनिवारी पहाटे सहा वाजता धायतडकवाडी शिवारातील जोगेश्वरी मंदिराजवळील ओढ्यामध्ये पांडुरंग आंधळे यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे तिनखडी गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.