अहिल्यानगर (प्रतिनिधी):
अहिल्यानगर वाहतूक कोंडी दिवसेंदिवस गंभीर होत असून, दिवाळीपूर्वी शहरात वाहतुकीचा गोंधळ वाढण्याची शक्यता आहे. अशा पार्श्वभूमीवर नागरिकांना होणाऱ्या त्रासावर तोडगा काढावा आणि गर्दीच्या ठिकाणी योग्य पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे. अहिल्यानगर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तात्काळ उपाययोजना राबवाव्यात, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे यांना निवेदन देण्यात आले. पक्षाने नमूद केले की, अहिल्यानगर वाहतूक कोंडी नियंत्रित न झाल्यास दिवाळीच्या काळात नागरिकांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागेल.
या निवेदनात शहरातील वाहतूक शाखेचे कर्मचारी कायमस्वरूपी नेमावेत, प्रेमदान चौकातील सिग्नल कार्यान्वित करावेत, तसेच नाकाबंदी आणि मोटारसायकलवरील गैरप्रकारांवर कठोर कारवाई करावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, महिला जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे, प्रा. आशा निंबाळकर, माणिकराव विधाते, कुमारसिंह वाकळे, अजिंक्य बोरकर, विपुल शेटीया, सुनील त्रिंबके, सागर बोरुडे, प्रकाश भागानगरे, संजय सपकाळ, संजय चोपडा, युवराज शिंदे, सारंग पंदाडे, वैभव ढाकणे, प्रा. अरविंद शिंदे, अमोल गाडे, लता पवार, सागर गुंजाळ, अंजली आव्हाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दसऱ्याच्या काळातही वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला होता, आणि जर दिवाळीतही अशीच परिस्थिती राहिली, तर नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होऊ शकतो. तसेच चेन स्नॅचिंगच्या वाढत्या घटनांवर पोलिसांनी कठोर कारवाई करून महिलांच्या सुरक्षेची हमी द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
शहरातील दिल्लीगेट, भिस्तबाग, कायनेटिक चौक, माळीवाडा एसटी स्टँड आणि भिंगार कॅम्प या ठिकाणी वाहतूक शाखेचे कर्मचारी कायमस्वरूपी नेमावेत, तर तोफखाना, कोतवाली व भिंगार पोलिस हद्दीत दररोज नाकाबंदी करण्यात यावी. बिननंबर, फॅन्सी नंबर आणि आवाज करणाऱ्या मोटारसायकलींवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे.
वरील सर्व मागण्यांची १४ ऑक्टोबरपर्यंत अंमलबजावणी न झाल्यास, राष्ट्रवादी काँग्रेसकडून जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे यांचे मत
“ब्लॅक स्पॉट नाकाबंदी केली जाणार असून संध्याकाळी सात ते बारा वाजेपर्यंत ठिकठिकाणी तपासणी होईल. वाहतूक कोंडीत आम्हीदेखील अडकलो आहोत; कर्मचाऱ्यांची संख्या मर्यादित आहे. वाहतूक समस्या फक्त पोलिसांची नाही, सर्व नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे.
महापालिकेने शहरातील सर्व सिग्नल सुरू ठेवावेत आणि ठेकेदारांनी काम सुरू असलेल्या ठिकाणी सूचना फलक लावणे आवश्यक आहे. अनेक रस्त्यांवर स्ट्रीट लाईट बंद आहेत, याबाबत पालिकेकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. आता नगरसेवक म्हणून तुम्ही हे प्रश्न पालिकेत सोडवून घ्यावेत,” अशी अपेक्षा घाडगे यांनी व्यक्त केली.