अहिल्यानगर | २९ सप्टेंबर २०२५
शहरातील माळीवाडा परिसरात मुस्लिम धर्मगुरूंच्या नावाची विटंबना झाल्याच्या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला आहे. संतप्त नागरिकांनी छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत निषेध व्यक्त केला.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एका तरुणाने धर्मगुरूंच्या नावाची रांगोळी काढून विटंबना केली. यामुळे मुस्लिम समाजात तीव्र संताप निर्माण झाला. संबंधित तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे.
विटंबनेविरोधात नागरिकांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. वाहतूक ठप्प झाल्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना रस्ता मोकळा करण्याचे आवाहन केले. मात्र आंदोलक हटण्यास तयार नसल्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज करत जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला.
शहरात सध्या तणावपूर्ण शांतता असून पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून कायदा-सुव्यवस्था आटोक्यात आहे.