अहिल्यानगर | प्रतिनिधी
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला असून, शहरात निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. ११ नोव्हेंबर रोजी प्रभागनिहाय आरक्षण सोडत होणार असल्याने अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक आता प्रत्यक्ष दारात आली आहे. या प्रक्रियेनंतर २ डिसेंबरनंतर कोणत्याही क्षणी निवडणुकीचा बिगुल वाजू शकतो.
महानगरपालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०२५ दरम्यान आरक्षित जागांची संख्या निश्चित केली जाणार असून, त्यास राज्य निवडणूक आयोगाची मान्यता मिळवण्यासाठी प्रस्ताव सादर केला जाईल. यानंतर ८ नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडतीची अधिकृत जाहिर सूचना प्रसिद्ध होईल.
११ नोव्हेंबर रोजी प्रभागनिहाय आरक्षण सोडत पार पडून त्याचा निकाल राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी पाठवला जाईल. पुढे १७ नोव्हेंबर रोजी प्रारूप आरक्षण जाहीर करून नागरिक, राजकीय पक्ष आणि इच्छुकांकडून हरकती व सूचना मागविण्यात येतील. या हरकती दाखल करण्याची शेवटची तारीख २४ नोव्हेंबर ठेवण्यात आली आहे.
अहिल्यानगर महापालिका आयुक्तांकडून या सर्व हरकतींचा विचार करून अंतिम निर्णय घेतला जाईल. राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर २ डिसेंबर रोजी अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रकाशित होईल. त्यानंतर कोणत्याही क्षणी निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.महानगरपालिकेच्या वेबसाईटवरही माहिती देण्यात आली आहे. http://amc.gov.in
या संपूर्ण प्रक्रियेनंतर शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. सर्व पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी, कार्यकर्त्यांच्या बैठका, आणि रणनिती आखण्यास सुरुवात झाली आहे. अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक ही २०२५ मधील सर्वात लक्षवेधी आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाची निवडणूक ठरणार आहे, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.
