अहिल्यानगर | १४ डिसेंबर २०२५
शहरातील ऐतिहासिक वारशाचा भाग असलेल्या माळीवाडा वेस हटविण्याचा प्रस्ताव अखेर रद्द करण्यात आला आहे. नागरिकांच्या तीव्र हरकती, इतिहासप्रेमींचा विरोध आणि सामाजिक संघटनांच्या दबावानंतर महानगरपालिकेने या निर्णयातून माघार घेतली आहे.
महानगरपालिकेने १३ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहीर सूचनेद्वारे माळीवाडा वेस हटविण्याबाबत (पडण्याबाबत) नागरिकांकडून हरकती व सूचना मागविल्या होत्या. रस्ता रुंदीकरण आणि वाहतूक सुधारणा या कारणांसाठी हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र, या निर्णयाविरोधात शहरभरातून संताप व्यक्त करण्यात आला.
माळीवाडा वेस ही १४–१५ व्या शतकातील पुरातन वास्तू असून, ती अहिल्यानगरच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक ओळखीचा अविभाज्य भाग मानली जाते. ही वास्तू पाडणे म्हणजे शहराचा इतिहास नष्ट करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप नागरिकांनी केला. अनेकांनी लेखी हरकती दाखल केल्या तर सोशल मीडियावरही प्रशासनावर जोरदार टीका झाली.

या प्रकरणामुळे काही काळ शहरात राजकीय वातावरण तापले होते. सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक रहिवासी आणि इतिहास अभ्यासकांनी एकत्र येत आंदोलनाचा इशाराही दिला होता. अखेर नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन महानगरपालिकेने हा प्रस्ताव रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पत्रक काढून दिली.
आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनाने नागरिकांच्या भावनांचा सन्मान राखत हा निर्णय घेतल्याने शहरातील ऐतिहासिक वारसा जपला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. भविष्यात अशा संवेदनशील निर्णयांपूर्वी व्यापक जनमत जाणून घेतले जाईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. तर काहींनी शहरात एवढे प्रश्न असताना बाहेरून आलेले अधिकारी ‘नको ते उद्योग’ का करतात असा प्रश्न उपस्थित केला.
नविन बातम्यांसाठी 👉 http://Ahilyanagar24live.com