अहिल्यानगर | 2 फेब्रुवारी 2026
अहिल्यानगर महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप युतीकडून उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. महापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती गाडे तर उपमहापौर पदासाठी भाजपचे अॅड. धनंजय जाधव यांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अहिल्यानगर महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप युतीने एकत्रित निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला 27 तर भाजपला 25 जागा मिळून युतीकडे एकूण 52 जागा आल्या आहेत.


दोन्ही पक्षांच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी विभागीय आयुक्त कार्यालयात स्वतंत्र गट नोंदणी केली असून, सत्ता वाटपाबाबत सहमती झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. महापौर पदासाठी एकापेक्षा अधिक अर्ज दाखल झाल्यास 6 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष सभेत मतदानाद्वारे निवड केली जाणार आहे. मात्र, दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्यास निवड बिनविरोध होऊन त्याची औपचारिक घोषणा 6 फेब्रुवारीला केली जाणार आहे.
महापौर पद राष्ट्रवादीकडे गेल्यानंतर उपमहापौर पद भाजपकडे जाण्याची शक्यता आधीपासूनच व्यक्त केली जात होती. त्याचबरोबर महापालिकेतील एक महत्त्वाची समितीही भाजपच्या वाट्याला जाण्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपमध्ये उपमहापौर पदासाठी हालचाली वेग घेत होत्या. अखेर पालकमंत्री विखे पाटील यांच्या पसंतीने नगरसेवक अॅड. धनंजय जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे.
🗓️ उमेदवारी अर्ज: 2 फेब्रुवारी 2026
🗳️ विशेष सभा / मतदान (आवश्यक असल्यास): 6 फेब्रुवारी 2026
नविन बातम्यांसाठी 👉 http://Ahilyanagar24live.com