अहिल्यानगर |प्रतिनिधी
महानगरपालिकेसाठी कचरा उचलण्याचे काम अहमदाबाद (गुजरात) येथील श्रीजी एजन्सी या कंपनीकडे गेल्या काही वर्षांपासून ठेका आहे. श्रीजी एजन्सीच्या तब्बल 20 लाख रूपये किंमतीच्या चार घंटागाड्या आणि त्या गाड्यांवर काम करणारे सात ड्रायव्हर व हेल्पर बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
श्रीजी कंपनीत मॅनेजर म्हणून काम करणारे सतीश साहेबराव शिरसाठ (रा. बुरूडगाव रस्ता, जहागीरदार चाळ, अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत दिली आहे. यात असे म्हटले आहे की, कंपनीने 2023 मध्ये चार घंटागाड्या खरेदी केल्या होत्या. मात्र त्यांची नोंदणी आरटीओकडे अद्याप झालेली नव्हती. गेल्या 10 महिन्यांपासून या गाड्यांवर मध्यप्रदेशातील ब्रिजेश सारेण, नुरा बारभोर, बबलु बारभोर, अरविंद अमलीयार, बुरा बारभोर, संजु मेढा व कमील कटारा हे सात इसम ड्रायव्हर व हेल्पर म्हणून काम करत होते.
हे सर्वजण दररोज सकाळी सात वाजता काम सुरू करून सायंकाळी पाचच्या सुमारास गाड्या अहिल्यानगर-दौंड रस्त्यावरील सागर शिंदे यांच्या मोकळ्या जागेत पार्क करून तिथेच राहत होते. मात्र सोमवारी (1 सप्टेंबर) संध्याकाळी गाड्या पार्क केल्यानंतर दुसर्या दिवशी सकाळी गाड्या व ड्रायव्हर बेपत्ता झाल्याचे लक्षात आले. सुपरवायझर अक्षय निकम व सागर ढुमणे यांच्यासोबत शोध घेतला असता गाड्या व इसम कुठेही सापडले नाहीत. या प्रकरणी कोतवाली पोलीसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. सात संशयित आरोपींसह चार गाड्या बेपत्ता झाल्याने महानगरपालिकेच्या कचरा संकलनाच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे.