अहिल्यानगर | विशेष प्रतिनिधी
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून, सायंकाळी पाच वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला शेवटच्या टप्प्यात जोर लावला आहे.
प्रभाग क्रमांक आठमध्ये सर्वसाधारण पुरुष ‘ड’ प्रवर्गातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे कुमार वाकळे हे बिनविरोध निवडून आले आहेत. मात्र उर्वरित तीन जागांसाठी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. या ठिकाणी मुख्य लढत राष्ट्रवादी अजित पवार गट, भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये होत आहे. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून एका जागेसाठी उमेदवार देण्यात आला असून काही अपक्ष उमेदवारही आपले नशीब आजमावत आहेत.
आज प्रचाराचा शेवटचा दिवस असला तरी प्रत्यक्षात मुख्य लढत ही शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी यांच्यात होत असल्याचे चित्र आहे. सर्वसाधारण पुरुष ‘क’ प्रवर्गातून राष्ट्रवादीकडून बाबासाहेब नागरगोजे तर शिवसेनेकडून नवनाथ कातोरे यांच्यात थेट सामना होत आहे.
दुसरी महत्त्वाची लढत ओबीसी महिला ‘क’ प्रवर्गाच्या जागेसाठी असून, येथे भाजपकडून आशाबाई लोभाजी कातोरे तर शिंदे गटाच्या शिवसेनेकडून पुनम अतुल लगड आपले नशीब आजमावत आहेत.
तिसरी लढत अनुसूचित जाती महिला ‘अ’ प्रवर्गासाठी होत असून, या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुनीता किसन भिंगारदिवे, शिंदे गटाच्या शिवसेनेकडून प्रियंका मनोज प्रभुणे, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मीना संजय देठे यांच्यासह काही अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत.
प्रभागाचा विस्तार, उमेदवारांची संपर्क असलेली ठिकाणे, जातीय समीकरणे आणि एकूण वातावरणाचा कानोसा घेतला असता, सूत्रांच्या माहितीनुसार बाबासाहेब नागरगोजे आणि नवनाथ कातोरे यांच्यातील लढतीत सध्या नवनाथ कातोरे यांचे पारडे जड वाटत आहे. प्रत्यक्षात असा निकाल लागल्यास राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
तर आशाबाई कातोरे आणि पुनम लगड यांच्यातील लढतीत आशाबाई कातोरे बाजी मारतील, अशी परिस्थिती असल्याचे बोलले जात आहे. असे झाल्यास माजी नगरसेवक अशोक कानडे यांच्या नंतर पुन्हा एकदा प्रभागात कमळ फुलण्याची शक्यता आहे.
तिसरी लढत मात्र अत्यंत रोचक ठरत असून, मत विभागणीचा फायदा कुणाला होईल आणि कुणाला नुकसान होईल, हे सांगणे कठीण आहे. या जागेसाठी अधिक उमेदवार रिंगणात असल्याने अपक्ष उमेदवार भालेराव, देठे आणि वाघमारे हे किती मतदान घेतात, यावर अंतिम निकाल अवलंबून राहणार आहे. मात्र या जागेसाठी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या मीना संजय देठे, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या सुनीता किसन भिंगारदिवे आणि शिंदे गटाच्या शिवसेनेच्या प्रियंका मनोज प्रभुणे यांच्यात अटीतटीची लढत होत असल्याचे चित्र आहे.
१५ तारखेला मतदान असून, लगेच दुसऱ्या दिवशी निकाल लागणार असल्याने या प्रभागासह संपूर्ण शहराचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. प्रत्यक्षात कोण बाजी मारतो, कुणाला धक्का बसतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
नविन बातम्यांसाठी 👉 http://Ahilyanagar24live.com