अहिल्यानगर : प्रतिनिधी
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. युती आणि महाविकास आघाडीबाबत अद्याप स्पष्टता नसतानाही अनेक इच्छुक उमेदवारांनी प्रत्यक्ष मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. अद्याप अधिकृत उमेदवारी जाहीर न झालेली असतानाही, काही उमेदवारांची नावे मात्र ‘निश्चित’ मानली जात असून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे.
याच पार्श्वभूमीवर शहरातील प्रभाग क्रमांक ८ मधून उमेदवारी निश्चित मानले जाणारे मा.नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी आज शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मार्गक्रमण केले. अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी बोल्हेगाव येथील मारुती मंदिरात दर्शन घेतले.
यानंतर वाकळे समर्थकांकडून भव्य बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीत मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते. रॅलीदरम्यान ‘कुमार भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा देत परिसर दणाणून गेला. यावेळी ज्येष्ठ नागरिकांनीही उपस्थित राहून वाकळेंना आशीर्वाद दिले.यावेळी मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या.

या शक्तीप्रदर्शनामुळे प्रभाग ८ मधील राजकीय समीकरणे स्पष्ट होऊ लागली असून, आगामी निवडणुकीत कुमारसिंह वाकळे याचे पारडे जड वाटत आहे. उमेदवारी अधिकृतपणे जाहीर होण्याआधीच सुरू झालेल्या या हालचालींमुळे इतर पक्षांचे आणि अपक्ष इच्छुक उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला अधिक वेग येणार असून, शहरातील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
नविन बातम्यांसाठी 👉http://Ahilyanagar24live.com