ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; विक्रम राठोडांचा पक्षाला जय महाराष्ट्र!

अहिल्यानगर | 29 डिसेंबर 2025

महानगरपालिका निवडणुकीला काहीच दिवस उरलेले असताना अहिल्यानगर शहरात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम अनिलभैय्या राठोड यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. विक्रम राठोड हे लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना विक्रम राठोड यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. “हा निर्णय घेताना मनाला खूप वेदना होत आहेत. मात्र पक्षाने वारंवार आमच्याकडे दुर्लक्ष केले. अडचणीच्या काळात पक्ष आमच्या सोबत उभा राहिला नाही,” असे ते म्हणाले.

पक्ष सोडण्याचा निर्णय जाहीर करताना युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड

राठोड पुढे म्हणाले की, “माझ्यावर ॲट्रॉसिटीसारखे खोटे गुन्हे दाखल झाले, त्या काळात पक्षाकडून कोणतीही साथ मिळाली नाही. गेली ४० वर्षे आम्ही शिवसेनेसाठी काम केले, उमेदवार दिले, कार्यकर्ते घडवले. मात्र आज मी माझ्या कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकलो नाही. त्यामुळे हा कठोर निर्णय घ्यावा लागला.” कोणीही बाहेरून येईल ज्याला नीट पक्ष माहित नाही आणि त्याच्या हाती तुम्ही सगळा कारभार देत असाल तर कसा पक्ष चालेल अशी टीका त्यांनी नाव न घेता किरण काळे यांच्यावर केली.

या घडामोडीमुळे अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, आगामी महापालिका निवडणुकीत याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

नविन बातम्यांसाठी 👉 http://Ahilyanagar24live.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!