मनपा निवडणूक : ठाकरेंच्या शिवसेनेत ‘राठोडांचा वारसा’ की ‘काळेंची तयारी

अहिल्यानगर | प्रतिनिधी

AMC election अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर होताच राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शहरातील शिवसेना ठाकरे  या निवडणुकीत ताकदीने उतरण्याच्या तयारीत आहे. मात्र पक्षाची दिशा आणि नेतृत्व कोणाच्या हातात राहणार – दिवंगत आमदार अनिलभैय्या राठोड यांचा वारसा पुढे नेत असलेले त्यांचे पुत्र विक्रम राठोड की सध्याचे शहरप्रमुख किरण काळे – याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राठोडांचा वारसा ; मा. आमदार अनिलभैय्या राठोड यांनी तब्बल २५ वर्षे शहरात शिवसेनेचा झेंडा फडकवला. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या प्रत्येक महापालिका निवडणुकीत पक्षाने ठसा उमटवला. त्यांचा प्रभाव इतका होता की, नगरकरांनी अनेकदा ‘शिवालया’ला साथ दिली. त्यांच्या निधना नंतरही शहरात त्यांना मानणारा मोठा मतदारवर्ग आहे. त्यामुळे विक्रम राठोड यांना जबाबदारी मिळाल्यास मतदारांमध्ये भावनिक लाट निर्माण होऊ शकते, अशी चर्चा आहे.

किरण काळेंची मोर्चेबांधणी; दुसरीकडे शहरप्रमुख किरण काळे निवडणुकीसाठी  तयारी करत आहेत. त्यांनी प्रभाग रचनेचा अभ्यास करून हरकती- सूचना सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच उमेदवार निवड, संघटन बळकटीकरण आणि बैठकींना वेग देत आहेत. “योग्य उमेदवार उभे करून शिवसेना ही निवडणूक जिंकणारच,” असा त्यांचा दावा आहे. नवे-जुने यांचा मेळ ठरणार निर्णायक राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, जर पक्षाने विक्रम राठोड यांना भैय्यांच्या वारशाचा प्रभाव याचा फायदा झाला, तसेच शहर प्रमुख काळे यांना बळ मिळाले, तर ठाकरे गट अधिक सक्षमपणे उभा राहू शकतो.तसे झाले तर शहरातील समीकरणे बदलू शकतात.

आघाडीचा प्रश्न अद्याप कायम; मनपा निवडणूक स्वबळावर लढायची की आघाडी करायची, याबाबत शिवसेना ठाकरे पक्षाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. काळे यांनी स्पष्ट केले की, “आघाडीबाबत चर्चा झालेली नाही. अंतिम निर्णय वरिष्ठ नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखालीच घेतला जाईल.” अहिल्यानगर मनपा निवडणूक शिवसेनेसाठी केवळ प्रभागांची चाचपणी नाही, तर नेतृत्वाची कसोटी ठरणार आहे. राठोड यांचा वारसा की किरण काळे यांची तयारी – या दोघांचा मेळ घालता आला, तर ठाकरे गटाला शहरात पुनरागमनाची संधी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!