अहिल्यानगर (प्रतिनिधी):
नगरमध्ये प्रशासनाला हाताशी धरून दर्गा समाजमंदिर पाडणे, मोर्चे काढणे, रस्ता रोको करणे आणि कायदेशीर मार्गांना बगल देत सामाजिक शांतता बिघडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष, माजी नगराध्यक्ष दीप चव्हाण यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात सध्याच्या लोकप्रतिनिधींवर कठोर शब्दांत टीका केली आहे.
चव्हाण म्हणाले की, “हा सर्व प्रकार आगामी महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी रचलेला डाव आहे.”

ते पुढे म्हणाले की, शिवसेनेचे नेते, माजी मंत्री दिवंगत आमदार अनिलभैय्या राठोड यांनी ‘भयमुक्त नगर’ हा नारा फक्त दिला नाही, तर प्रत्यक्षात तो सत्यात उतरवला. हिंदू धर्मरक्षक म्हणून त्यांची प्रतिमा केवळ भावनिक नव्हती, तर वस्तुनिष्ठ होती. राठोड यांनी कधीच जातीय दंगलींना खतपाणी घातले नाही, उलट नाजूक प्रसंगी साम, दाम, दंड, भेद वापरून समाजात शांतता प्रस्थापित केली. “लव्ह जिहादसारख्या संवेदनशील प्रकरणांतही त्यांनी कायद्याचा आणि संयमाचा मार्ग स्वीकारला. पण आज काही लोकप्रतिनिधी युवकांना भडकवून, बाहेरच्या नेत्यांना बोलावून प्रक्षोभक वक्तव्यं करून शहराचं वातावरण तापवत आहेत,” असा आरोप चव्हाण यांनी केला.
नगरच्या विकासकामांबाबत बोलताना ते म्हणाले, “१५० कोटी रुपयांची कामं काढून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकांना फसवलं जात आहे. अर्धवट रस्त्यांमुळे व्यापारी आणि नागरिक त्रस्त झाले आहेत. ५० कोटी रुपयांत कामं सुरू करून उरलेले १०० कोटी रुपये हवेतच विरले. आयुक्तांनाही ठेकेदारांकडे निधीसाठी हात पसरावा लागत आहे.”
चव्हाण यांनी पुढे म्हटलं की, “सणासुदीच्या काळात बाजारपेठेत मोर्चे काढून दुकाने बंद ठेवायला लावणे म्हणजे आर्थिक गोंधळ माजवण्याचा डाव आहे. आज प्रत्येक व्यवसायात सर्व धर्मीय बांधव सहभागी आहेत. त्यामुळे विशिष्ट धर्माच्या लोकांकडूनच व्यवहार करा, हा नारा समाज तोडणारा आहे.”
शेवटी त्यांनी प्रशासनाला आवाहन केलं की, अशा प्रकारे कायदा हातात घेणाऱ्या व्यक्तींवर वेळीच कारवाई व्हावी. शहरात शांतता, भाईचारा आणि सोहार्द कायम राहावा, तसेच येणारे सण-उत्सव सर्वांनी आनंदात, बंधुत्वाच्या वातावरणात साजरे करावेत. “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या समता, एकता आणि धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वांनुसार सर्वांनी वागावं,” असं आवाहनही त्यांनी केलं.