अहिल्यानगर | प्रतिनिधी
प्रवरानगर-लोणी येथे रविवारी (दि. ५ ऑक्टोबर) दुपारी बरोबर १२ वाजता केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचे अनावरण होणार आहे. त्याच कार्यक्रमात विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या नूतनीकरणाचा शुभारंभ तसेच भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह केंद्रीय व राज्यस्तरीय अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. स्थानिक कार्यकर्त्यांच्या बैठकीत या संदर्भातील तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले.
प्रवरानगरातील सहकारी परंपरेला नवा आयाम देण्यासाठी कारखान्याच्या नूतनीकरणात सुमारे ३०० कोटी रुपयांचा निधी गुंतवला गेला असून, यामुळे कारखान्याची दैनिक गाळप क्षमता सध्याच्या ७,००० टनांवरून १०,००० टनांपर्यंत वाढणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.
विखे पाटील कुटुंबाच्या सहकारी चळवळीतील योगदानाची दखल घेत या पुतळा अनावरण कार्यक्रमाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. केंद्र सरकारने इथेनॉल निर्मिती व करसवलतीसंबंधी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांमुळे राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना नवसंजीवनी मिळाल्याचे मानले जाते. या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम केवळ स्मृतिस्थापना नसून सहकारी क्षेत्राला नवे बळ देणारा ठरणार आहे.
सभेच्या माध्यमातून अमित शहा शेतकरी, कामगार व सहकारी क्षेत्राशी निगडित मुद्द्यांवर संवाद साधण्याची शक्यता आहे. प्रवरानगर व लोणी परिसरात या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग अपेक्षित आहे.